आयपीएल मेगा ऑक्शन 2025 मध्ये श्रेयस अय्यर याने धमाका केला आहे. टीम इंडियाच्या या स्फोटक फलंदाजाने इतिहास घडवला आहे. श्रेयस अय्यर आयपीएल ऑक्शनच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. श्रेयसला 25 कोटींपेक्षा अधिक रक्कम मिळाली आहे. श्रेयसला आपल्या गोटात घेण्यासाठी 2 कोटी या बेस प्राईजपासून सुरुवात झाली. विविध फ्रँचायजींनी श्रेयसला आपल्यात घेण्यासाठी बोली लावली. मात्र श्रेयसची कामगिरी पाहता त्याला आपल्या टीममध्ये घेण्यासाठी फ्रँचायजींमध्ये चुरस असल्याने 25-25 लाखाने बोली वाढत गेली. श्रेयसची किंमत पाहता पाहता 24 कोटींच्या पार गेली. मात्र त्यानंतरही श्रेयसवर बोली लावली जात होती.
श्रेयसचा आकडा 25 कोटींच्या पुढे गेला. श्रेयसला आपल्याकडे घेण्यासाठी उत्साही असलेल्या फ्रँचायजींनी वाढलेली किंमत पाहता बॅकफुटवर येणं पसंत केलं. मात्र सर्वात मोठी बोली ही पंजाब किंग्सने लावली होती. मात्र त्यानंतर कुणीच बोली लावली नाही. त्यामुळे कोलकाताला आयपीएलच्या 17 व्या मोसमात चॅम्पियन करणारा कर्णधार श्रेयस अय्यर हा आता पंजाब किंग्सचा भाग झाला आहे. पंजाबने श्रेयससाठी थोडेथोडके नाहीत, तर 26 कोटी 75 लाख रुपये मोजले आहेत.
श्रेयस अय्यर याने आयपीएल कारकीर्दीत 115 सामने खेळले आहेत. श्रेयसने या 115 सामन्यांमध्ये 127.48 च्या स्ट्राईक रेटने आणि 32.24 सरासरीने 3 हजार 127 धावा केल्या आहेत. तसेच श्रेयसने या दरम्यान 113 षटकार आणि 271 चौकार लगावले आहेत. श्रेयस अय्यर याने त्याच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सला गत हंगामात आयपीएल ट्रॉफी मिळवून देत 12 वर्षांची प्रतिक्षा संपवली. श्रेयसने 2024 मध्ये केकेआरचं नेतृत्व केलं. श्रेयसने आपल्या नेतृ्त्वात आणि मेन्टॉर गौतम गंभीर याच्या मार्गदर्शनात चॅम्पियन केलं होतं. केकेआरने याआधी 2012 साली आयपीएल ट्रॉफी उंचावली होती. तेव्हा गौतम गंभीर कर्णधार होता. तर त्याआधी श्रेयसने 2020 मध्ये दिल्ली कॅपिट्ल्सला आयपीएल फायनलपर्यंत पोहचवलं होतं. मात्र तेव्हा मुंबई इंडियन्सने दिल्लीला पराभूत केलं होतं. त्यामुळे दिल्लीला तेव्हा उपविजेतापदावर समाधान मानवं लागलं होतं.