इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाच्या अकार्यक्षम लोकप्रतिनिधींमुळे गेल्या ३५ वर्षांत मतदार संघाचा विकास खुंटला आहे. आता आम्ही भाजपा सरकारच्या माध्यमातून मतदार संघाचा विकास साधत असताना विरोधक आम्ही मंजूर करून आणलेल्या कामाचे श्रेय लाटत आहेत. त्यांनी स्वतः कामे मंजूर करून आणून नारळ फोडावेत, असा सल्ला भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील (दादा) यांनी आ. जयंत पाटील यांना नाव न घेता दिला.
मसुचीवाडी, फार्णेवाडी, खरातवाडी (ता. वाळवा) येथे विविध विकास कामांच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जितेंद्र पाटील, धैर्यशील मोरे, निवास पाटील, अशोक खोत, चंद्रकांत पाटील, सुरेखाताई जगताप, संदीप सावंत, मधुकर हुबाले, दादासाहेब रसाळ, यदुराज थोरात प्रमुख उपस्थित होते.
निशिकांत भोसले-पाटील म्हणाले, भाजपा केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून विविध विकास कामे होत आहेत. आत्ताचे सरकार हे लोकांना आपले सरकार वाटत आहे. प्रत्येक घटकापर्यंत विकास पोहचविणे हेच, या सरकारचे ध्येय आहे. आज
मसुचीवाडी फार्णेवाडी, खरातवाडी गावात कामगार मंत्री तथा पालकमंत्री ना. सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून कोट्यवधी रुपयांचा निधी आला. जितेंद्र पाटील म्हणाले जनतेच्या प्रश्नांची जाण असणारे नेतृत्व निशिकांतदादा यांच्या रूपाने वाळवा तालुक्याला मिळाले आहे. आता निशिकांत दादांच्या पाठपुराव्याने मोठा निधी मिळत आहे. तालुक्याच्या विकासासाठी व जनतेच्या कामांसाठी आम्ही एकत्र आहोत.