मोठी बातमी! शिंदे गटाच्या नेत्याच जयंत पाटलांसोबत जेवणं आणि चर्चा….

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार शरद सोनवणेंनी आज शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची भेट घेतली.तसेच त्यांच्यासोबत जेवणाचा आस्वादही घेतला. शिवस्वराज्य यात्रेची आज सुरुवात झाली आहे. जुन्नरमधील सभेनंतर जयंत पाटील हे दुपारच्या भोजनासाठी जय हिंद महाविद्यालयात थांबले होते. तिथं सोनवणेंनी हजेरी लावत जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख तसेच खासदार अमोल कोल्हेंसोबत जेवणाचा आस्वाद घेतला.

जेवण करताना शरद सोनवणे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काही चर्चा केली आहे का, अशी चर्चा देखील आता रंगू लागली आहे. गेल्याच महिन्यात अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी थेट शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर आता सोनवणेंनी तुतारी फुंकण्याची तयारी दर्शवल्याचं बोललं जात आहे.आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी दौरे, बैठका, संवाद सुरु केले आहेत. दरम्यान, एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची राज्यभरात जनसन्मान यात्रा सुरु आहे.

या यात्रेच्या माध्यमातून ते नागरिकांशी संवाद साधत आहेत. सरकारच्या योजना जनतेला सांगत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानेही शिवस्वराज्य यात्रेला आजपासून सुरूवात केली आहे. आज राज्यात पुन्हा रयतेचे राज्य आणण्यासाठी शिवस्वराज्य यात्रा काढणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिली आहे. ही यात्रा आज (शुक्रवारी) शिवनेरी किल्ल्यावरून सुरू झाली आहे. आजपासून शिवस्वराज्य यात्रा सुरु झाली आहे. पहिल्या टप्प्यात ही यात्रा दहा दिवसात महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांतून फिरणार आहे. त्यानंतर लवकरच दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली जाणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.