राज्य शासनाने एक राज्य एक गणवेशाचा निर्णय घेतला आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये आता एकाच रंगाचा गणवेश राहणार आहे. आकाशी रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची पँट यासाठी मान्यता दिली आहे.
येणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्ष २०२४- २०२५ या वर्षात याची अंमलबजावणी केली जाणार आहे. सध्या प्राथमिक शाळांमध्ये नवा गणवेश दिला असून, अन्य शाळांनाही यापुढे अशाच प्रकारचा गणवेशाचा पॅटर्न राबवावा लागणार आहे.
शैक्षणिक वर्ष संपत येत असल्याने पुढील शैक्षणिक सत्रापासून या निर्णयावर अंमलबजावणी केली जाणार आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील विद्यार्थी या निर्णयामुळे एकाच गणवेशात दिसणार आहेत. तथापि, हे गणवेश वेळेत मिळावे, अशी मागणी देखील होत आहे. यात पहिली ते चौथीपर्यंतच्या मुलीकरिता आकाशी रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाचा स्कर्ट किंवा याचे एकत्रित असलेले स्वरूप म्हणजे पिनो फ्रॉक असा पॅटर्न राहणार आहे.
पाचवी ते सातवीपर्यंतच्या मुलींना शर्ट व स्कर्ट अशा प्रकारचा गणवेश राहणार आहे. तसेच आठवीतील मुलींसाठी आकाशी रंगाचा कुर्ता व गडद निळ्या रंगाची सलवार असा पॅटर्न असून त्यावर निळ्या रंगाची ओढणी असणार आहे.पहिली ते सातवीपर्यंतच्या मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि निळ्या रंगाची हाफ पँट असा गणवेश असेल.
तसेच आठवीतील मुलांसाठी फूल पँट व हाफ शर्ट ही गणवेश रचना असून सर्व विद्यार्थ्यांच्या शर्टवर शोल्डर स्ट्रीप व दोन खिसे ठेवणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये आकाशी रंगाचा शर्ट व निळ्या रंगाची पँट असा गणवेश देण्यात येणार आहे. सर्व शाळांतील विद्यार्थ्यांनाही याच प्रकारचा गणवेश निश्चित करण्यात आला आहे.