सततच्या वीजपुरवठा खंडितमुळे नागरिकांतून तीव्र संताप….

सांगोला तालुक्यात सध्या कडक उन्हाळा जाणवत आहे. उन्हाळी पिके या उन्हामुळे लवकर सुकत आहेत. यामुळे तीन ते चार दिवसांत या पिकांना पाणी द्यावे लागते. सध्या वीज मंडळाकडून काही भागांमध्ये शेतीसाठी आठ तास, तर काही भागांमध्ये चार तास वीजपुरवठा केला जातो; पण हा वीजपुरवठा सतत खंडित केला जातो. त्यामुळे शेतीला पाणी देण्यासाठी एक शेतकरी, तर वारंवार वीज जात असल्याने मोटारीच्या पेटीजवळ एक शेतकरी अशी अवस्था झाली आहे.

त्यातूनही एका फ्यूजमध्ये कमी दाबाने वीजपुरवठा सोडला जातो. हा वीजपुरवठा सतत वेगवेगळ्या फ्युमध्ये सोडला जातो, तर काही वेळा ज्यादा वीजपुरवठा सोडला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरीवरील व विंधन विहिरींच्या मोटारीही जळण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. सांगोला तालुक्यात वीजपुरवठा सतत खंडित केला जातो. तसेच कमी दाबाने वीजपुरवठा केल्याने शेतकऱ्यांच्या मोटारी व शेती उपयुक्त साहित्य जळत आहे तसेच घरगुती साहित्यही जळत आहे.

वीज वापरणाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. वीज मंडळाच्या गलथान कारभाराची चौकशी व्हावी, अशी मागणी जनतेमधून केली जात आहे. तसेच ग्रामीण भागामध्ये शेतीच्या वीज प्रवाहावरच ग्रामीण भागातील कुटुंबांना घरातील वीजपुरवठा केला आहे. हा घरातील वीजपुरवठाही सतत खंडित केला जातो. यामुळे नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.