निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वीच…..

देशाच्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम येत्या काही दिवसांमध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. आचारसंहितेची टांगती तलवार डोक्यावर घेऊनच राजकीय घटक आपली गणिते ठरविण्यात व्यस्त झाले आहेत. निवडणूक म्हटल्यावर प्रचारयंत्रणा राबविण्यासाठी वाहनांची व्यवस्था ते कार्यकर्त्यांची जेवण व्यवस्था आदी गणिताचीही जमवाजमव उमेदवाराला करावी लागते. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याअगोदरच प्रचारासाठीच्या वाहनांपासून ते कार्यकर्त्यांच्या श्रमपरिहारासाठी लागणाऱ्या जेवणावळीचेही दर निश्चित झाले आहे.

लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी वापरात येणाऱ्या गाड्यांचे प्रतिकिलो मीटरप्रमाणे दर निश्चित झाले आहेत. व्हेज जेवण दीडशे रुपयांना, तर नॉनव्हेज जेवण २५० रुपयांना मिळणार आहे. चहा : सहा रुपये कप, कॉपी : १२ रुपये कप, वडापाव : १२ रुपये, भजी, पोहे, कचोरी, फरसाण : १५ ते २० रुपये, अशाप्रकारे नास्टा आणि जेवणावळीचे दरही ठरविल्यामुळे प्रचाराचा लवाजमा सांभाळताना उमेदवारांना तारेवरची कसरत कारावी लागणार आहे.

रिक्षाला २४० किलोमीटरसाठी ८८० रुपये, तर १२० किलोमीटरसाठी ४४० रुपये दर असेल. जीप, टेम्पो, टॅक्सी, बोलेरो, टाटा व्हीक्ट्रा, क्वालिस, तवेरा या गाड्यांचे प्रतिदिन २४० किलोमीटरसाठी २७५०, तर १२० किलोमीटरसाठी १३७५ रुपये दर निश्चि्त करण्यात आला आहे. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा या दरात वाढ झाल्याने प्रचारही महागणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या सर्व खर्चांवर नजर ठेवली आहे. उमेदवाराला प्रत्येक खर्च दररोज निवडणूक विभागाला सादर करावा लागणार आहे.

याकरिता दरही ठरवून देण्यात आले आहेत. निवडणूक प्रचारात वापरल्या जाणाऱ्या १२५ केव्ही जनरेटरची किंमत प्रतिदिन १५ हजार रुपये, लाउडस्पिकर, माईक, अॅम्पिलीफायरसाठी प्रतिदिन ६ हजार रुपये, ट्यूबलाइट ५० रुपये, हॅलोजन ७० रुपये, फॅन १३ रुपये, कुलर २५० रुपये, एलईडी टीव्ही ११९५ रुपये यांसह लॅपटॉप, एलईडी व्हॅन, ड्रोन कॅमेरा आदींचेही दर निश्चित करण्यात आले आहेत.

राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत चर्चा करून हा प्रत्येक दर निश्चित करण्यात आले आहेत. उमेदवारांच्या बैठका, कोपरा सभा, रॅली अशा प्रत्येक ठिकाणी प्रशासनाचे व्हिडिओ सर्व्हेलन्स पथक खर्चावर लक्ष ठेवणार आहे. याखेरीज व्हिडिओ व्ही विंग पथक (व्हीव्हीटी), खर्च निरीक्षक हेदेखील उमेदवाराने सादर केलेला खर्च आणि पथकाने नोंदविलेला खर्च याची पडताळणी करणार आहे. उमेदवाराच्या खर्चात हा खर्च मोजला जाणार आहे.

फुलांच्या हारांचे दरही ठरलेले आहेत. प्रचार आणि मेळाव्यादरम्यान कोणताही उमेदवार अडीच फुटांच्या सफारी हारासाठी १३० रुपये, तर सात ते नऊ फुटांच्या हारासाठी ४५० रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. मिनरल वॉटरच्या बाटल्या कंपनीने जाहीर केलेल्या किमतीवर खरेदी केल्या जाऊ शकतात.