उष्माघातापासून स्वत:ला वाचवण्यासाठी उन्हाळ्यात असा घ्या आहार……..

वातावरणात उष्मा वाढला की, काहीही खावेसे वाटत नाही. आपला रोजचा आहार अगदी नकोसा होऊ लागतो. वातावरणात बदल झाल्यावर ज्याप्रमाणे आपण कपड्यांमध्ये बदल करतो. अगदी त्याचप्रमाणे उन्हाळ्यातील आहार हा देखील बदलायला हवा. आहारात हे बदल केले तर उन्हाळ्यात थंडावा मिळण्यास मदत मिळते. उन्हाळ्यातील आहार  नेमका कसा असायला हवा. अगदी पेयापासून ते तुमच्या मेनकोर्सपर्यंत तुम्ही काय काय घेतले तर तुम्हाला त्याचा फायदा होईल हे आज आपण जाणून घेऊया. एप्रिल, मे आणि ऑक्टोबर महिना हा अधिक त्रासदायक असतो. अशा या तापमानात काय खावे यासाठी ही खास माहिती.

दही मोडून तयार करण्यात आलेले ताक हे या उन्हाळ्यातील आहार यामधील उत्तम असे पेय आहे.  या दिवसात ताक प्यायल्याने पचनाला मदत मिळते. जेवणानंतर किंवा जेवताना तुम्ही थोडे थोडे ताक प्याल तर पचनशक्ती चांगली होते. ताकामध्ये थोडीशी जीरापूड किंवा चाट मसाला घातला की, त्याचा फायदा तुम्हाला होण्यास मदत मिळेल. उन्हाळ्यातील आहार यामध्ये याचा अगदी हमखास समावेश करायला हवा.

तुम्ही भाजी करणार असाल तर पालेभाजी (पालक,मेथी, मुळा, माठ) अशा भाज्या खा. इतकेच नाही तर या दिवतास कडधान्यांनाही चांगले मोड येतात. त्यामुळे याचा देखील समावेश करा. तुम्ही गरम मसाल्याची भाजी करण्यापेक्षा कमीत कमी मसाले घालून अशा भाज्या बनवा. 

उन्हाळ्याच्या दिवसातील अगदी चांगली गोष्ट म्हणजे कैरी आणि आंबा. या दोन्ही गोष्टी तुमच्या आहारात असायला हव्यात. कैरीपासून तयार करण्यात आलेले कैरी पन्हे हे फारच लाभदायची असते. त्यामुळे पचनाच्या समस्या कमी होण्यास मदत मिळते. कैरीच्या पन्ह्यामध्ये असलेला कैरीचा अर्क हा तुमची भूकही वाढवतो. 

शरीराला थंडाव्याची गरज असेल आणि पोट भरण्याची देखील अशावेळी तुम्ही दही वडा खाऊ शकता. दही वडा हा चटपटीत असतो. त्यामुळे तुमचे पोट भरते. शिवाय तुम्हाला एकदम थंड आणि शांत वाटते. तुम्हाला ॲसिडीटी झाली असेल आणि अशावेळी तुम्ही दहीवडा खाल्ला तर तुम्हाला थोडासा आराम नक्की मिळेल.

कोकम, नारळाचे दूध यापासून तयार केेलेली सोलकढी ही देखील खूप पौष्टिक असते. कोकमामुळे शरीराला थंडावा मिळतो. सोलकढीसोबत मऊ भात छान लागतो. पोटाला थंडावा मिळतो. पचन चांगले होते. त्यामुळे तुम्ही हमखास याचे सेवन करायला हवे. या शिवाय कलिंगड खाण्याचे फायदे मिळवू शकता.

संध्याकाळच्या वेळी काहीतरी खायची इच्छा होत असेल तर तुम्ही कडधान्यांचे चाट करुन खाऊ शकता. कडधान्य ही शरीराला प्रोटीन पुरवण्याचे काम करतात. त्यामुळे उन्हाळ्याताच नाही तर तुम्ही इतरवेळी देखील अशा प्रकारे कडधान्यांचे चाट करुन खाऊ शकता. कडधान्यांचे चाट करताना तुम्ही त्यामध्ये मस्त कांदा- टोमॅटो देखील घालू शकता. त्यामुळे याची चव अधिक वाढते.