लोकसभा निवडणूकांच्या तारखा या आठवड्यात जाहीर होऊ शकतात, अशी चर्चा सुरू आहे. त्याचदरम्यान पक्षांमध्ये इनकमिंग-आऊटगोईंग वेगाने सुरू आहे. भाजपमध्ये तर येणाऱ्यांची संख्या वाढतच चालली आहे. काँग्रेसमधील अनेक वरिष्ठ नेत्यांनी भाजपचा मार्ग धरला. त्यामध्ये अशोक चव्हाणांसारख्या बड्या नेत्याचाही समावेश आहे. त्यांच्यामागोमाग काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यादेखील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा महिन्याभरापासून रंगली आहे. सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे भाजपात प्रवेश करणार असल्याचे वृत्त गेल्या काही दिवसांपासून येत होते. त्यावर सुशीलकुमार शिंदे यांनीच वक्तव्य केलं होतं. मात्र आता या सर्व चर्चांवर प्रणिती शिंदे यांनी मौन सोडले आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी प्रणिती शिंदे यांच्याकडून सोलापूर लोकसभेतील गावभेटीचा सपाटा लावला आहे. त्यावेळी प्रणिती शिंदे यांनी भाजपवर सडकून टीका केली. सोलापूर लोकसभेसाठी भाजप कडून मी उमेदवार असल्याच्या अफवा पसरवत आहेत. पण माझ्या रक्तातच काँग्रेस आहे. माझे वडील काँग्रेसमध्ये आहे म्हणून मी काँग्रेसमध्ये नाही. तर सर्वधर्मसमभाव या विचारावर माझा विश्वास आहे. मी कामावर विश्वास ठेवते. मी लोकशाही वर विश्वास ठेवते म्हणून मी काँग्रेसमध्ये आहे. मी काही ईडीला भीत नाही. माझ्याकडे कारखाना नाही, संस्था नाही. नशीब शिंदे साहेब त्यात पडले नाहीत. त्यामुळे मला ईडीची कसलीही भीती नाही. मी दिलखुलासपणे भाजप विरुद्ध बोलणार, असं प्रणिती शिंदे म्हणाल्या.
भाजपवाल्यांकडून माझ्या नावाची अफवा उठवली जात आहे. सोलापूर जिल्ह्यात विरोधी पक्षाची मी एकमेव आमदार आहे. बाकी सर्व आमदार भाजपचे आहेत. भाजपचे आमदार सत्ताधाऱ्याविरुद्ध बोलत नाहीत. त्यामुळे तुमच्या, सामान्य नागरिकांच्या समस्या सत्ताधाऱ्यांसमोर कोण मांडणार ? सध्या हुकूमशाही सरकार असल्यामुळे आमदार घाबरत आहेत. सर्वच भाजपमध्ये आहेत. सोलापूर लोकसभेसाठी भाजप कडून मी उमेदवार असल्याच्या अफवा पसरवत आहेत. पण माझ्या रक्तातच काँग्रेस आहे याचा पुनरुच्चार करत त्यांनी भाजपमध्ये जाण्याच्या सर्व अफवांना पूर्णविराम दिला.