अंबाबाई मूर्तीची तज्ञांकडून दोन तास बारकाईने पाहणी! उद्या पुन्हा…..

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मूर्तीची गुरुवारी पुरातत्व विभागाचे निवृत्त अधिकारी आर. एस. त्र्यंबके व विलास मांगिराज यांनी पाहणी केली. तब्बल दोन तासाहून अधिक काळ केलेल्या या पाहणी दरम्यान त्यांनी मूर्तीच्या चेहऱ्यावर अधिक लक्ष केंद्रित केले होते.

आज शुक्रवारी पून्हा ते मूर्तीची पाहणी करणार आहेत. दरम्यान त्यांनी मूर्तीच्या सध्यस्थितीवर भाष्य करणे टाळत आम्ही न्यायालयात अहवाल सादर करू असे सांगितले.श्री अंबाबाई मूर्तीची प्रचंड झीज झाल्याने ती सध्या नाजूक स्थितीत आहे.

मूर्तीचे संवर्धन केले जावे यासाठी श्रीपूजक गजानन मुनिश्वर यांनी दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता, तसेच मूर्तीची स्थिती नेमकी कशी आहे हे पाहण्यासाठी त्यात पुरातत्व विभागाच्या निवृत्त अधिकाऱ्यांकडून पाहणी केली जावी अशी मागणी केली होती.

न्यायालयाने ही मागणी मान्य केल्यानंतर गुरुवारी सकाळी ७ वाजता पुरातत्व’चे निवृत्त अधिकारी आर. एस. त्र्यंबके व विलास मांगिराज यांनी मूर्तीची पाहणी सुरू केली. साडे नऊ वाजेपर्यंत ही पाहणी चालली.

या दरम्यान त्यांनी मूर्तीच्या चेहऱ्यावर अधिक लक्ष केंद्रित केले. तसेच संपूर्ण मूर्तीची स्पंजिंग करण्याआधी आणि स्पंजिंग केल्यानंतर अशा दोन टप्प्यांमध्ये पाहणी केली. तसेच मोबाईलवर व्हिडिओ व छायाचित्रे घेतली.