अलीकडे महिलांचे जीवन खूपच असुरक्षित बनलेले पहावयास मिळत आहे. अनेक रोडरोमियोंचा त्रास त्यांना सहन करावा लागत असल्याचे चित्र अनेक वेळा पहायला मिळते. सोलापुरात तरुणाच्या त्रासाला कंटाळून एका अल्पवयीन मुलीने गळफास घेत आत्महत्या केली. 1 जानेवारी रोजी हा प्रकार घडला असून या प्रकारणी आरोपी विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वेणूगोपाळ विटकर असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. आरोपी तरुण हा मागील काही दिवसापासून अल्पवयीन मुलीला त्रास देत होता.
वारंवार तीच्यापाठीमागे जाणे, तिला बोलण्याचा प्रयत्न करणे, अशा प्रकारे त्याने अल्पवयीन मुलीला त्रास दिला होता. एकेदिवशी या तरुणाने मुलीला प्रपोज केलं, हा संपूर्ण प्रकार मुलीनं घरी सांगितल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी मुलाला समज दिली होती. मात्र त्यानंतर देखील त्याने त्रास देणं, सुरुचं ठेवलं होतं.
याच त्रासाला कंटाळून आपल्या मुलीने आत्महत्या केल्याची फिर्याद अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिली आहे. मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून आरोपी तरुणाच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 108 सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कलम 12 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेनंतर पालकांनी आणि नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.