देशभरात आजपासून होणार पेट्रोल-डिझेल स्वस्त!

लोकसभा निवडणुकीआधीच आता घोषणांचा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. देशात पुढच्या एक ते दोन दिवसांत आचारसंहिता लागू शकते. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा केली जाऊ शकते. या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधक प्रचंड कामाला लागले आहेत. असं असताना आता केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणूक जाहीर होण्यास अवघा काही काळ शिल्लक असताना मोदी सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर स्वस्त करत असल्याची घोषणा केली आहे.

संपूर्ण देशभरात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हे दर स्वस्त होणार आहेत. हे दर लगेच आजपासून लागू देखील होणार आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्राच्या या घोषणेनंतर आता महाराष्ट्रात शिंदे सरकारकडूनही पेट्रोल-डिझेलच्या दरात घट करण्याचा किंवा पेट्रोल-डिझेलच्या वॅट कमी करण्याची घोषणा केली जाते का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. तसेच त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांवर विधानसभेची निवडणूक आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्याआधी केंद्र सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रतिलीटर 2 रुपयांनी स्वस्त करत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. पेट्रोल-डिझेलचे हे स्वस्त दर आज सकाळी 6 वाजेपासून देशभरात लागू होणार आहेत. त्यामुळे देशभरातील नागरिकांना आता मोठा दिलासा मिळणार आहे.