हुपरी येथे गुंतवणूकदारांचे ठिय्या आंदोलन अखेर स्थगित

हुपरी येथे जवळपास ४८ दिवस गुंतवणूकदारांचे आंदोलन सुरू होते. हुपरी येथील राजेंद्र भिमराव नेर्लीकर यांच्या घराजवळ गुंतवलेले पैसे परत मिळवण्यासाठी विविध तालुक्यातून येऊन ठिय्या मारून बसलेल्या आंदोलकांची नेर्लीकर यांच्या कुटुंबातील सदस्यांनी हुपरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्या अनुषंगाने आंदोलन स्थगित करीत असल्याची लेखी माहिती हुपरी पोलिस ठाण्यात आंदोलकांनी दिली आहे. दरम्यान, यामुळे या फसवणूक प्रकरणाचे गूढ वाढले असून आता पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, १० मार्चला शिवसेनेच्या प्रवक्त्या सौ. दिपाली सय्यद यांनी आंदोलकांची भेट घेऊन धीर देत हुपरी पोलिस ठाण्यात ठिय्या मारु असे जाहीर केले होते.

या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना भेटून सविस्तर चर्चेअंती ईडीमार्फत चौकशी करण्याची हमी दिली होती व हुपरी शहरातील एका महिलेने दिलेल्या प्रलंबित तक्रारीच्या अनुषंगाने गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. यामुळे या फसवणूक प्रकरणाची धग वाढत चालली होती. मात्र या प्रकरणाने आता वेगळाच यु-टर्न घेतला आहे. नेर्लीकर यांच्या कुटुंबातील सदस्यांनी या आंदोलनामुळे आम्हाला दैनंदिन जीवनात त्रास होत असून उदरनिर्वाहाची अडचण होत असल्याचे अर्जात नमूद केले आहे.

शिवाय राजेंद्र भिमराव नेर्लीकर हे कित्येक दिवसांपासून लापता असल्याने हुपरी पोलिस ठाण्यात मिसींग नोंद दिली आहे. सदर अर्जावर २७ लोकांच्या सह्या आहेत. यामुळे आता कायदेशीर लढाईत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.