आजपासून हुपरीच्या श्री अंबाबाई देवीच्या यात्रेस सुरुवात……

हुपरी गावचे ग्रामदैवत असणाऱ्या श्री अंबाबाई देवीची यात्रा आजपासून सुरु होणार आहे. हुपरी येथील वरदायिनी श्री अंबाबाई देवीच्या यात्रेची लगबग सुरू झाली आहे. यात्रेमध्ये महत्त्वाचा घटक असणारे छोटे मोठे दुकानदार, खेळणी विक्रते, पाळणे वाले तसेस विविध वस्तू विक्रेते या सर्वांनीच जाग्यावर स्टॉल लावायला सुरुवात केली आहे. मंदीर समितीने रंगरंगोटी पुर्ण करुन काकडे बंधूंच्या अधिपत्याखाली मंदिर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे. एकंदरीत यात्रा कमिटी व पोलिस प्रशासन भाविकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहेत.


आज यात्रेच्या पुर्व संधेला मंडप पुजा होऊन खऱ्या अर्थाने यात्रेला सुरुवात होणार आहे. शनिवारी दि. २ रोजी पहाटे चंदूर, कबनूर, शेमनेवाडी व हुपरी शहरातील मानकऱ्यांच्या सासनकाठ्यांचे आगमन व भक्तीपर्ण भेटीचा सोहळा बाजारपेठेत
होणार आहे. मानकरी पाटील, सेवेकरी, बारा बलुतेदार व भाविकांच्या प्रचंड गर्दीत पारंपरिक वाद्यांच्या गजरात
सवाद्य मिरवणूक आगमन होताच पहिला पालखी सोहळा सुरू होतो आणि यात्रेला सुरुवात होते . दि. ३ रोजी भरयात्रा आहे. संपूर्ण हुपरी शहरातील बाजारपेठ यात्रेसाठी सजली असून भाविकांना या सोहळ्याची आतुरता लागून राहिली आहे. मंदीरावर आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजळून निघाला आहे.

हुपरी पोलिस ठाण्याचे पीआय लिंगाप्पा चौखंडे यांनी यात्रेच्या अनुषंगाने हालचाली गतिमान केल्या आहेत तर सामाजीक सेवाभावी संस्था श्री अंबाबाई भक्तमंडळ व यात्रा कमिटीने उत्तम नियोजन केलेचे दिसून येत आहे. दरम्यान या अनेक दानशूर भक्तांनी देवीला सोन्या चांदीसह रत्नजडित अलंकार अलंकार मुकूट चढवून आपली श्रद्धा-भक्तिभाव प्रकट केला आहे. यात्रेच्या आगमनाचे औचित्य साधून चांदी उद्योजक सतिश दुर्योधन भोजे यांनी १ किलो १०० ग्रॅम वजनाचे चांदीचे किरीट अर्पण केले आहे. ते विधीवत पुजेसह देवस्थानचे पुजारी, पाटील मानकरी व सेवेकरी यांच्या उपस्थित देण्यात आले आहे.