रेंदाळ गावचे ग्रामदैवत श्री बिरदेव यात्रा हि उद्या रविवारपासून चालू होणार आहे. या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आलेले आहे. हि यात्रा २० मार्च पर्यंत असणार आहे. यात्रेनिमित्त निकाली कुस्त्यांसह विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देवस्थान व यात्रा कमिटीने आयोजित बैठकीत दिली आहे.
यात्रेनिमित्त उद्या रविवार ता. १७ मार्च रोजी सकाळी ८ वाजता बिरदेव मंदिरात धार्मिक विधीच्या सोहळ्यानंतर पहिली पालखी, सोमवार ता. १८ रोजी ११ वाजता दुसरी पालखी व मानाचा नैवेद्य, भरयात्रा आहे. संध्याकाळी ५ वाजता तिसरा पालखी सोहळा होईल. मंगळवार ता. १९ रोजी पहाटे ५ वाजता पालखी गाव प्रदक्षिणासाठी निघणार असून भानूस मंदिरात भंडारा वाटी देत मानकऱ्यांच्या मानाने यात्रेचा समारोप होईल.
यात्रेनिमित्त श्री बिरदेव मंदिर माळभाग येथे रात्री ८ वाजता ढोल वादन स्पर्धा, धनगरी ओव्यांच्या स्पर्धा, झेंडा चौक येथे रेकॉर्ड डान्स स्पर्धा तसेच विविध करमणुकीचे कार्यक्रम आयोजित केले आहेत तसेच बुधवार ता. २० मार्चला निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित केले आहे तरी याचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या बैठकीला देवस्थान कमिटी व यात्रा कमिटीचे सर्व सदस्य, इतर मान्यवर व विविध विभागांचे पदाधिकारी उपस्थित होते.