सध्या अनेक भागात अतिक्रमण तर पहायला मिळतच आहे याचबरोबर अनेक भटकणारे प्राणी देखील पहायला मिळतात. यामध्ये भटकी कुत्रे जास्त प्रमाणात पहायला मिळतात. हुपरी शहरातील भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी हुपरी शहर छत्रपती ग्रुपच्यावतीने हुपरी नगरपरिषदेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. हुपरी शहरातील भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे. गावातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः मुले, वृद्ध आणि पाळीव प्राणी यांना अधिक धोका निर्माण झाला आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रातून घेतलेल्या माहिती नुसार मागील काही म हिन्यात गावातील भटक्या कुत्र्याने चावा घेतलेले रुग्ण वाढले आहेत. नगरपरिषद प्रशासनाने तातडीने याबाबत उपाय योजना राबवून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी छत्रपती ग्रुपचे सौरभ खोत, शिरोळ तालुका प्रमुख संदीप पवार, शुभम चोपडे, उमाजी लाड, संग्राम जाधव, कुणाल खोत, साताप गायकवाड, प्रदीप चव्हाण, सोमनाथ नंदाळे, सूर्यकांत रावण, जितेंद्र पाटील आदी उपस्थित होते.