भोंग्यावर कारवाई करा हिंदू राष्ट्र समितीची निवेदनाद्वारे मागणी

मश्जिदीवरील भोंग्यांचा मुद्दा अनेक भागात खूपच जोर धरू लागला आहे. या भोंग्यांना अनेक माध्यमातून विरोध देखील दर्शविला जात आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हुपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मश्जिदीवरील भोंग्यांवर तात्काळ कारवाई करून ध्वनीप्रदूषण थांबवावे, यासाठी हिंदुराष्ट्र समन्वय समितीकडून हुपरी पोलीस ठाण्याला निवेदन देण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मस्जिदीवरील लाऊड स्पीकरचा वापर हा इस्लाम धर्माच्या आवश्यक धार्मिक प्रथांचा भाग नाही. त्यामुळे मस्जिदीवरील भोंगे त्वरित हटवून त्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियन, पर्यावरण संरक्षण अधिनियम, ध्वनी प्रदूषण  नियंत्रण आणि प्रतिबंध नियमानुसार अनाधिकृत लाऊडस्पीकरवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे.

रात्री १० नंतर आणि सकाळी ६ वाजण्याच्या अगोदर लाऊडस्पीकरचा वापर झाल्यास तातडीने कारवाई करावी, त्याचबरोबर ध्वनीमर्यादा ओलांडणाऱ्या मस्जिदींवर गुन्हे नोंद करण्यात यावेत. याबाबत कारवाई न झाल्यास कायदेशीर मार्ग अवलंबणार असल्याचेही हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे नितीन काकडे यांनी निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर प्रसाद लोहार, सौरभ खोत, संदीप मुधाळे, उमाजी लाड, सुनील लाड, सुनील दळवे आदींसह हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या सदस्यांच्या सह्या आहेत.