शनिवारी गाझा पट्ट्यातून इस्राइलवर मोठ्या प्रमाणात मिसाईल हल्ला करण्यात आला होता. हा हल्ला हमास या दहशतवादी संघटनेने केला होता. यानंतर इस्राइल आणि हमासमध्ये युद्ध सुरू झालं आहे. यातच हमासचा कमांडर मोहमूद अल-जहरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
इस्राइल ही तर केवळ सुरुवात असून, लवकरच संपूर्ण जगावर आम्ही कब्जा करणार आहे; असं या कमांडरने म्हटलं आहे. “आम्ही ताब्यात घेतल्यानंतर पृथ्वीच्या संपूर्ण 510 मिलियन स्क्वेअर किलोमीटर भागातून अन्याय नाहीसा होईल. या जगामध्ये कुणावरही जुलूम होणार नाहीत, विश्वासघातकी ख्रिश्चन धर्म नसेल आणि पॅलेस्टिनी किंवा अरबी लोकांच्या हत्या होणार नाहीत.” असंही तो म्हणाला.
हा व्हिडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर काही तासांमध्येच इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आपलं स्टेटमेंट जारी केलं. “हमास ही दाएश (इस्लामिक स्टेट) प्रमाणेच दहशतवादी संघटना आहे. ज्याप्रमाणे जगाने आयएसचा नायनाट केला, त्याप्रमाणेच आम्हीदेखील हमासला नष्ट करू.” असं नेतन्याहू म्हणाले.
शनिवारी (7 ऑक्टोबर) हमासने इस्राइलवर तब्बल पाच हजार मिसाईल डागले होते. तसंच, हमासच्या दहशतवाद्यांनी इस्राइलच्या सीमेतून आत शिरत नागरिकांची हत्या करण्यास सुरुवात केली होती. यानंतर काही तासांमध्येच इस्राइलने युद्धाची घोषणा करत हमासवर हल्ला केला होता. यानंतर इस्राइल आणि हमासमध्ये भीषण युद्ध सुरू झालं आहे.