लोकसभा निवडणूक रंजक बनली! शिवसेना, राष्ट्रवादीत फूट ….

महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी अशा 5 टप्प्यात लोकसभा निवडणुका होणार आहेत. महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राज्यात होणारी लोकसभेची निवडणूक ही पहिलीच मोठी निवडणूक आहे. लोकसभेच्या 48 जागांसाठी महाआघाडी आणि महायुती अशी मोठी लढत पहायला मिळणार आहे. पण, फुटीच्या वातावरणामुळे ही निवडणूक अधिक मनोरंजक बनणार आहे. 2019 च्या निवडणुकीत भाजप – शिवसेना युतीने गेल्यावेळी 41 जागा जिंकून आपली ताकद दाखविली होती. मात्र, आता राज्यातले मित्र आणि विरोधक बदलले आहेत.

2019 च्या निवडणुकीत भाजपने राज्यात सर्वाधिक 23 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर अविभाजित शिवसेना 18 जागांसह आघाडीवर आहे. अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसने 4, काँग्रेस, AIMIM आणि अपक्ष यांनी प्रत्येकी 1 जागा जिंकली. राज्यात 100 वर्षांवरील 50,000 हून अधिक ज्येष्ठ नागरिक आहेत. तर, एकूण 9.2 कोटी लोक निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पात्र आहेत. 2019 च्या तुलनेत या निवडणुकीत 34 लाख मतदार वाढले आहेत.

महाराष्ट्राला सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. याच प्रांताला कोकण असे म्हटले जाते. या किनारपट्टीच्या प्रदेशात देशाची व्यापारी राजधानी मुंबईचाही समावेश आहे. तर, शेजारील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी जिल्हेही याच भागात येतात. मुंबई जिल्ह्यात 6 लोकसभा, ठाणे जिल्ह्यात 3, तर पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येकी 1 जागा अशा मिळून 12 जागा आहेत. यातील भाजप आणि शिंदे गटाकडे 4 जागा आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे 1 तर शिवसेना ठाकरे गटाकडे 3 जागा आहेत.