इचलकरंजीत तीन दिवस शाहिरी महोत्सवाचे आयोजन

राज्य सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आज मंगळवारपासून इचलकरंजी येथे तीन दिवस शाहिरी महोत्सवाचे आयोजन केले आहे. सुप्रसिद्ध शाहिरांच्या वीर रसांचे पोवाडे ऐकायला मिळणार आहेत.शाहिरी व संगीतावर आधारित असा सांस्कृतिक महोत्सव दररोज सायंकाळी सात वाजता घोरपडे नाट्यगृहात आयोजित केला आहे.

दरम्यान, या महोत्सवामध्ये इचलकरंजी मध्ये अनेक शाहीर असतानाही या महोत्सवामध्ये एकालाही संधी दिली न दिल्याने नाराजीचा डफ वाजवला जात आहे. शाहीर विजय जगताप संजय जाधव, हिंदुराव लोंढे यांच्यासह नामांकित शाहीर येथे आहेत.

हि नाराजी वरिष्ठांच्या कानावर घालण्यात आल्यानंतर क्रांती व कीर्ती जगताप यांच्या पोवाड्याने कार्यक्रमाची सुरुवात तर विजय जगताप यांच्या हस्ते शाहिरांचा सत्कार असा बदल करून स्थानिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला.

नाट्य, चित्रपट, कला, बालनाट्य महोत्सव याप्रमाणे शाहिरी महोत्सव व्हावा अशी संकल्पना विजय जगताप यांनी दहा वर्षांपूर्वी बोलून दाखवली होती. त्यानंतर पहिला महोत्सव पुण्यात शनिवारवाड्यासमोर पार पडला होता. पण तो इचलकरंजीत होत असताना स्थानिकांना डावलल्याची खंत शाहिरांनी बोलून दाखवली.