पर्वतीय राज्यांमध्ये ढगफुटीसम पावसानं विध्वंस

2025 या वर्षामध्या पाऊस (Rain) तुलनेनं बराच आधी देशाच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर धडकला आणि पाहता पाहता याच पावसानं सारा देश व्यापला, सध्याच्या घडीला मात्र हाच पाऊस देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये संकटाचं रुप घेताना दिसत आहे. दरवर्षीच्या मुहूर्ताहून अर्थात 8 जुलैच्या आधीच मान्सून देशाच्या विविध राज्यांमध्ये पोहोचला असून त्यामुळं हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर यांसारख्या स्वर्गाहून सुंदर राज्यांमध्ये हाहाकार माजला आहे. तर, झारखंड, ओडिशा, गुजरात आणि केरळमध्येसुद्धा ढगफुटीसदृश्य पावसानं थैमान घातल्यानं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक भागांमध्ये रस्तेच्या रस्ते पाण्याच्या जोरदार आणि अतिप्रचंड प्रवाहानं वाहून गेले आहेत. तर, काही भागांमध्ये स्थानिकांची घरंसुद्धा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली आहेत.

हिमाचल प्रदेशमध्ये पावसामुळं मोठं नुकसान झालं असून, कुल्लू आणि कांगडा या भागांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्यानं पूरस्थिती निर्माण झाली आहे. ज्यामध्ये घरं, रस्ते आणि मोठाले पुलसुद्धा वाहून गेले आहेत. आतापर्यंत इथं 17 जणांचा या पुरात मृत्यू ओढावला असून, 20 जण अद्यापही बेपत्ता असल्याचं म्हटलं जात आहे. शिमला हवामान केंद्रानं 5 जुलैपर्यंत बिलासपूर, हमीरपूर, कांगडा, मंडी, शिमला, सोलन, सिरमौर, ऊना, कुल्लू आणि चंबा या भागांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. कुल्लूच्या सैंज खोऱ्यात ढगफुटी झाल्यानं ब्यास नदीनं रौद्र रूप धारण केलं असून स्थानिकांना सखल भागांतून सुरक्षितरित्या उंचावर स्थित भागांमध्ये स्थलांतरीत करण्यात आलं आहे. या भागांमध्ये सध्या सुरक्षा दलांसह बचाव पथकंसुद्धा सतर्क असल्याचं पाहायला मिळत आहे.

तिथं उत्तराखंडमध्येसुद्धा हीच परिस्थिती कायम असून, चारधाम यात्रेवर याचा थेट परिणाम होताना दिसत आहे. बद्रीनाथ- ऋषिकेश महामार्ग यामुळं प्रभावित झाला असून उत्तराखंजडमध्ये पावसामुळं उदभवललेल्या संकटकालिन परिस्थितीमध्ये 65 जणांचा मृत्यू ओढावल्याचं म्हटलं जात आहे. जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्येसुद्धा ढगफुटीमुळं गावंच्या गावं जलमय झाली आहेत. तर अनेकांचा या संकटामध्ये मृत्यूसुद्धा ओढावला आहे. केंद्रीय हवामान शास्त्र विभागाच्या माहितीनुसार 5 जुलैपर्यंत उत्तर भारतातील या पर्वतीय राज्यांमध्ये पावसाचं प्रमाण वाढणार असून त्यामुळं नागरिकांना सतर्क राहत सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.