माढा लाेकसभा मतदारसंघात दाै-यावर असलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले.सांगोला तालुक्यातील वाडेगाव या गावात प्रवेश करण्यापासून माेहिते पाटील यांना मराठा समाजाने राेखले. नेते मंडळींना गावात प्रवेश बंदी असल्याची भूमिका मराठा समाजातील युवकांनी ठामपणे मांडली. त्यामुळे माेहिते पाटील यांनी परतीचा मार्ग स्विकारला.
माढा लाेकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे महायुतीचे उमेदवार आहेत. नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली गेल्याने माेहिते पाटील गट नाराज झाला आहे. भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी निवडणूकीच्या रिंगणात उतरण्यासाठी दाैरे सुरु केले आहेत.
सांगोला तालुक्यातील वाडेगाव येथे धैर्यशील मोहिते पाटील बुधवारी रात्री आले असता मराठा समाजातील युवकांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या गाडी पुढे गाजरं आणि टोमॅटो टाकून गावात बैठक घेण्यास विरोध केला.मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तो पर्यंत गावात येण्यास नेत्यांना बंदी घातली आहे.
बंदी असताना तुम्ही गावात आलेच कसं असा जाब स्थानिक मराठा समाजातील युवकांनी माेहिते पाटील यांना विचारला. यावेळी युवकांनी एक मराठा लाख मराठा घोषणा दिल्या. यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला. दरम्यान धैर्यशील पाटील हे वडगाव येथे बैठक न घेता नियाेजित पुढील कार्यक्रमास रवाना झाले.