उष्माघात कोणाला होऊ शकतो? बचावासाठी काय करावे?

”हीट वेव’ किंवा उष्णतेची लाट ही एक मूक आपत्ती (सायलेंट डिझास्टर) आहे. सलग तीन दिवस कमाल तापमानापेक्षा वातावरणातील तापमान ३ डिग्री सेल्सिअसने जास्त असेल, तर त्याला उष्णतेची लाट म्हणतात.सलग दोन दिवस तापमान ४५ अंशांवर असल्यास उष्णतेची लाट आली आहे, असे समजावे. यामुळे होणारी हानी टाळण्यासाठी ‘हीट ॲक्शन प्लॅन’ आखण्यात येतो.”

उष्माघात गंभीर बाब आहे. शरीराचे तापमान जेव्हा १०६ डिग्री सेल्सिअस हे १५ मिनिटांकरिता राहते, तेव्हा शरीरावर गंभीर परिणाम होतात. शरीराची तापमान नियंत्रण यंत्रणा काम करीत नाही. प्रथिने उष्णतेमुळे खराब होतात.विविध प्रकारचे लायपो प्रोटिन्स आणि फॉस्पोलिपिड्स अस्थिर होतात. शरीरातील मेद पदार्थ वितळतात. यामुळे रक्ताभिसरण संस्था अकार्यक्षम होते. अवयवांचे कार्य ठप्प होऊ लागते. वेळेवर तातडीची वैद्यकीय सेवा न मिळाल्यास मृत्यूची शक्यता असते.

उष्णतेमुळे होणारा त्रास

उष्णतेमुळे शरीरावर रॅश उमटतात, हातापायाला गोळे व चक्कर येते, तापमान १०६ वर गेल्यास मृत्यूची शक्यता

बचाव करण्यासाठी हे करा

पुरेसे पाणी प्यावे. पाणी सोबत ठेवावे. हलक्या वजनाचे, फिकट रंगाचे, सैलसर कपडे वापरावे. उन्हात गॉगल, छत्री, पादत्राणे वापरावे. उन्हात टोपी/हॅटखाली ओलसर कपडा ठेवावा. पाळीव प्राण्यांना सावलीत, थंड ठिकाणी ठेवावे. कष्टाची कामे सकाळी किंवा संध्याकाळी ४ नंतर करावीत. ओलसर पडदे, पंखा, कूलर यांच्या मदतीने घर थंड ठेवा.

हे करू नका

शक्यतो उन्हात घराबाहेर जाणे टाळा. पार्क केलेल्या वाहनात लहान मुलांना ठेवू नका. गडद रंगाचे, तंग कपडे वापरू नका. उन्हाच्या काळात स्वयंपाक करणे टाळा. स्वयंपाकघर हवेशीर ठेवा. मद्य, चहा, कॉफी, सॉफ्ट ड्रिंक्स टाळा.

उष्णतेचा त्रास कुणाला होतो?

उन्हात कष्टाची कामे करणारे. वृद्ध आणि लहान मुले. स्थूल लोक, जाड कपडे घालणारे. पुरेशी झोप न झाल्यास. गर्भवती महिला. अनियंत्रित मधुमेह. हृदयरोग असणारे. अपस्माराचे रुग्ण. दारूचे व्यसन असणारे. काही विशिष्ट औषधे घेणारे. निराश्रित, बेघर नागरिक.