राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना 5 रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली आहे. मात्र, अद्याप हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आलेलं नाही. अशातच दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची एक जाहीरात प्रसिद्ध होत आहे. यामध्ये दूध उत्पादक शेतकीर श्रीमंत होणार, मार्चअखेर दुधाचे अनुदान शेतकऱ्यांना मिळणार असल्याचा उल्लेख करण्यात आलाय. याच मुद्यावरुन किसान सभेचे नेते डॉ. अजित नवलेंनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका केलीय. विखे पाटलांचा हा प्रकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा असल्याचे नवले म्हणाले.
दुधाचे अनुदान देण्याची घोषणा सरकारनं केली आहे मात्र, अटी शर्ती व ऑनलाइन डेटाच्या जटीलतेमुळं शेतकऱ्यांना अद्यापही अनुदान मिळालेले नाही. अशा पार्श्वभूमीवर दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील पाच रुपयाच्या न मिळालेल्या अनुदानाच्या जोरावर शेतकरी श्रीमंत होणार असल्याच्या जाहिराती करत असतील तर यापेक्षा अधिक खेदजनक दुसरी कोणतीही गोष्ट असू शकत नाही असे अजित नवले म्हणाले. राज्यातले सरकार आणि दुग्धविकास मंत्र्यांचा अशा जाहिरातीबाबत, असंवेदनशीलतेबाबत तसेच निष्क्रियतेबाबत करावा तेवढा निषेध थोडा असल्याचे अजित नवले म्हणाले.