संजय राऊतांनी रणशिंग फुंकलं!

 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सांगली दौऱ्यापूर्वीच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगली लोकसभेसाठी पुन्हा एकदा दंड थोपटले आहेत. त्यामुळे सांगली लोकसभेची जागा आता नेमकी कोणाच्या पारड्यात जाणार? याची राजकीय उत्सुकता पश्चिम महाराष्ट्रात शिगेला पोहोचली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एखादी जागा आमच्याकडे असावी आणि ती ताकदीने लढवावी, अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली. त्यामुळे आता सांगली लोकसभेची जागा कोणाकडे जाणार आता याची चर्चा रंगली आहे. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांच्या सांगली दौऱ्यापूर्वी सांगली लोकसभा जागेवरील दावा प्रबळ केला आहे. 

ते म्हणाले की कोल्हापूरची जागा आमची असताना सुद्धा ती आम्ही हसत हसत सोडली. याच्या आम्हाला यातना झाल्या. त्यामुळे आमचे कार्यकर्ते म्हणत आहेत आपण सांगलीची जागा लढवूया. त्यांनी सांगितले की, आज (21 मार्च) सकाळी शरद पवार यांच्या चर्चा झाली. यानंतर उद्धव ठाकरे आणि मी आणि आमचे प्रमुख नेते कोल्हापूरकडे रवाना होणार आहोत. याठिकाणी श्रीमंत शाहू महाराज यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देणार आहोत आणि तसेच त्यांचे आशीर्वाद घेणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.