इचलकरंजी शहराला पाणी पुरवठा करणा-या कृष्णा योजनेच्या मजरेवाडी येथील उपसा केंद्राला सील ठोकण्यात आले. सुमारे १० कोटीच्या थकबाकी वसुलीसाठी सांगली पाटबंधारे विभागांने ही कारवाई केली.कोणतीही पूर्वकल्पना न देता ही कारवाई करण्यात आल्यामुळे महापालिका प्रशासनाची तारांबळ उडाली होती.
यातून मार्ग काढण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरु होते. अखेर थकबाकीपोटी २७ लाखांचा भरणा करीत असल्याचे महापालिकेने कळविल्यानंतर (शुक्रवार) सकाळी १० वाजता सील काढण्यात येईल, असे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. इचलकरंजी शहराला कृष्णा नदीतून बहुतांशी पाणी पुरवठा केला जातो. दररोज ३५ एमएलडी इतके पाणी मजरेवाडी येथील उपसा केंद्रातून केले जाते.
दरवर्षी त्यापोटी पाटबंधारे विभागाकडून सुमारे चार ते साडेचार कोटी इतके शुल्क आकारणी केली जाते. मात्र महापालिकेकडून वेळेत त्याचा भरणा न केल्यामुळे रक्कम थकीत गेली आहे. यामागे तांत्रिक कारण असल्याचेही महापालिका प्रशासनाचे मत आहे.