मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांसाठी १५०० रुपये बँकेच्या बचत खात्यामध्ये जमा करण्याची योजना शासनाने सुरु केलेली आहे. यापूर्वी ज्या महिलांनी बचत खाती उघडली आहेत अशा सर्व महिलांच्या खात्यांमध्ये त्याचा लाभ मिळणार आहे. पण ज्यांनी अद्याप खाते उघडलेले नाही त्यांच्यासाठी झिरो बॅलेन्सवर खाते उघडून दिले जाणार आहे. महिलांनी बँकेत झिरो बॅलन्सवर बचत खाते उघडल्यास या खात्यामध्ये शासनामार्फत दिले जाणारे १५०० रुपये आपोआप जमा होणार आहेत.
या योजनेसाठी येथील कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या वतीने ज्या महिलांनी अद्याप बँकेत बचत खाते उघडले नाही अशा महिलांना झिरो बॅलन्सवर बचत खाते उघडून दिले जाणार आहे. या सुविधेचा लाभ महिलांनी घ्यावा, असे आवाहन बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे यांनी केले आहे. परिसरातील सर्व माता- भगिनींनी या योजनेचा लाभ घेवून कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेमध्ये बचत खाते उघडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इतकेच नव्हे तर, बँकेचा स्वतःचा क्युआर कोड उपलब्ध असून ज्या त्या दिवशी पैसे बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार असल्यामुळे व्यावसायिक दृष्टीकोनातून याचा फायदा सर्वांना होणार आहे. त्यामुळे अनेक व्यापार व उद्योग क्षेत्रातील व्यक्तींनी या योजनेचा लाभ घ्यावा व बँक देत असलेल्या क्युआर कोड चा अवलंब करावा, असेही आवाहन चेअरमन स्वप्निल आवाडे यांनी केले आहे.