तारदाळमध्ये रस्ते व पाणीपुरवठा योजना रखडली….

कोरोची, तारदाळ, निमशिरगाव या रस्त्यासाठी गेली चार वर्षे निधी मंजूर असूनही काही शेतकऱ्यांचा आडकाठीपणा व अनेक ठिकाणी मक्तेदाराची अडवणूक यामुळे रस्त्यांची कामे रखडली आहेत. तर जलजीवन मिशन योजना कामाच्या संथगतीमुळे रस्ता अपुरा व पाणीपुरवठा योजनाही अपुरी अशी भयानक अवस्था तारदाळ गावची झाली असून नागरिकांना खाचखळगे असलेल्या रस्त्यातूनच ये-जा करावी लागत आहे.

परंतू याकडे कोणाचेही लक्ष नाही.पाटील मळा पोवार मळा ते राम मंदीर परिसरातील रस्ता म्हणजे मरणाला आमंत्रण असे असताना गेली सहा वर्षे लोकप्रतिनिधींना या भयानक अवस्थेचे चित्र दिसूनही त्याकडे लोकप्रतिनिधी व मक्तेदार यांच्यात समन्वयाचा अभाव जाणीवपूर्वक कानाडोळा करण्यात येत आहे. तसेच दत्त डेअरी ते शिरगाव फाटा पर्यंतचा रस्ता पूर्णपणे खचला असून जागोजागी खड्डे पडले आहेत. संबंधित मक्तेदाराला याबाबत विचारले असता आधी पाईपलाईन करा मगच रस्ता होईल तर जलजीवन मिशनचे मक्तेदार अजून या रस्त्यावरील पाईपलाईनचे इस्टीमेट अगर ड्राईंग न आल्याने आम्ही पाईपलाईन करू शकत नाही, अशी उत्तरे मिळत आहेत. त्यामुळे गावातील सर्वच रस्त्याची चाळण झाली असताना मक्तेदार, लोकप्रतिनिधी व नागरिक यांच्या समन्वयाअभावी सर्व मुख्य रस्ते रखडले आहेत.