निवडणूक काळात पार्ट्यांवर ‘एक्साईज’चे लक्ष! ढाबे, हॉटेलवर मद्यपान नको अन्यथा…….

लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरायला १२ एप्रिलपासून सुरवात होणार आहे. त्यानंतर ढाब्यांवरील पार्ट्या रंगतील. अशा पार्ट्यांवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष पथके नेमली आहेत.त्यांच्याकडून विनापरवाना मद्यपान करणाऱ्यांसह ढाब्यांवरील मद्यपी व ढाबा मालक-चालकांवर कारवाई होईल. कारवाईनंतर ढाबा चालकाला २५ हजार तर मद्यपींना पाच हजारांपर्यंत दंड भरावा लागू शकतो, असा इशारा अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दिला आहे.

निवडणूक म्हटले की दारू अन्‌ पैसा या दोन गोष्टींची नेहमीच चर्चा असते. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस व जिल्हा प्रशासनाकडून विशेष पथके नेमली आहेत. वास्तविक पाहता कोणालाही कोणत्याही ठिकाणी मद्यपान करता येत नाही. दुसरीकडे परमीट रूम, बिअरबारशिवाय कोठेही दारू, वाइन, बिअरची विक्रीही करता येत नाही. मद्यपींकडे आजीवन किंवा एक वर्षाचा परवाना बंधनकारक असून परवानाधारक मद्यपींनी परमीट रूममध्येच मद्यपान करणे आवश्यक आहे.नियम मोडणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करून न्यायालयात नेले जाते.

न्यायालयाच्या माध्यमातून संबंधितांवर दंडात्मक कारवाई होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आता निवडणूक काळात अशाप्रकारच्या कारवाई केल्या जाणार आहेत. परराज्यातून सोलापूर जिल्ह्यात येणाऱ्या विदेशी-देशी व गावठी दारू वाहतूक व विक्रीवर देखील लक्ष राहील, असेही श्री. धार्मिक यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले.