ऊन्हाळी सुटीनिमित्त गोवा पर्यटनाचा आनंद लुटून घराकडे परतणाऱ्या पर्यटकांची कार रस्त्यात उभी राहिल्याची संधी साधून चार अनोळखी व्यक्तींनी दगड व गजाचा धाक दाखवून पती-पत्नीच्या गळ्यातील सुमारे ९७ हजार रुपयांचे अडीच तोळे सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले.ही घटना शनिवारी पहाटे साडेचारच्या सुमारास सांगोला मिरज रस्त्यावरील पाचेगाव खुर्द उड्डाणपुलाजवळ घडली.
याबाबत बाबासाहेब मल्हारी जगताप (रा. कळमण, ता. उत्तर सोलापूर) यांनी फिर्याद दिली.फिर्यादी बाबासाहेब जगताप हे तीन दिवसांपूर्वी कुटुंबासह त्यांच्या (एमएच १४, व्हीआर ०६०४) या कारमधून गोव्याला फिरायला गेले होते. गोवा पर्यटन झाल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता कळमण गावाकडे निघाले होते.त्यांची कार मिरजकडून सांगोल्याकडे येत असताना वाटेत पाचेगाव खुर्द उड्डाणपुलाजवळ फिर्यादी जगताप यांना शनिवारी पहाटे ४:३०च्या सुमारास झोप आली. त्यांनी कार रस्त्याच्या कडेला उभी केली व फ्रेश होऊन पुन्हा कारमध्ये येऊन बसले.
त्यावेळी कारच्या डाव्या बाजूने आलेल्या चौघांनी फिर्यादी जगताप व त्यांच्या पत्नीला दगड व गजाचा धाक दाखवून, धमकावून फिर्यादीच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची चेन व त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील अर्धा तोळे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने काढून तेथून धूम ठोकली.या घटनेनंतर मंगळवेढाचे उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड, पोलिस निरीक्षक भीमराव खणदाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी करत आहेत.