भारत हा जगातील सर्वात जास्त पाम तेल आयात करणारा देश आहे. देशात पाम तेलाची सर्वात जास्त आयात ही इंडोनेशिया आणि मलेशियातून होते. परंतु भारताने सप्टेंबर महिन्यात पाम तेलाची आयात कमी केली आहे. याचा परिणाम संपूर्ण जागतिक पातळीवर तेलाच्या किमतीवर होणार आहे.
पामतेल आयातीत २६ टक्क्यांनी घट झाली आहे. यामुळे पाम तेल उत्पादक कंपन्यांकडे तेलाचा साठा वाढू शकतो. त्यामुळे जागतिक बाजारात पाम तेलाच्या किंमतीत कमी होण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये पाम तेलाची आयात सर्वात जास्त कमी झाली आहे. मागील महिन्यांच्या तुलनेत २६ टक्क्यांनी घसरली आहे. ही घट मागील ३ महिन्यातील सर्वाधिक घट आहे.
एका रिपोर्टनुसार, भारताने पाम तेलाच्या आयातीत घट केल्यामुळे इंडोनेशिया आणि मलेशियामधील तेलाचा साठा वाढण्याची शक्यता आहे. याचा परिणाम बेंचमार्क फ्युचरवर होऊ शकतो आणि किंमती खाली येऊ शकतात.
सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक बीव्ही मेहता याबाबत म्हणाले की, 5.5% कमी आयात शुल्कामुळे अलिकडच्या काही महिन्यांत भारत अतिरिक्त तेलाच्या पुरवठ्यासाठी पहिला आयात देश समजला जातो.
मुंबईतील खाद्यतेल व्यापाऱ्यांनी याबाबत सांगितले की, भारताने जुलै आणि ऑगस्ट महिन्यात गरजेपेक्षा जास्त आयात केली. त्या तुलनेत बाजारात मागणी कमी होती. त्यामुळे ते तेल विकण्यास खूप संघर्ष करावा लागत आहे. कमी मागणी अन् सोयाबीन पिकाची पेरणी सुरु झाल्यामुळे ऑक्टोबरमध्ये भारतातील वनस्पती, पाम तेलाच्या मागणीत आणखी घट होऊ शकते.