CSK vs RCB : ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वात चेन्नईची विजयी सलामी

ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्सने 17 व्या मोसमाची विजयी सुरुवात केली आहे. चेन्नईने आरसीबीवर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. आरसीबीने चेन्नईला विजयासाठी 174 धावांचं आव्हान दिलं होतं. चेन्नईने हे आव्हान 18.4 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून पूर्ण केलं. चेन्नईच्या विजयात सर्वच फलंदाजांनी योगदान दिलं. मात्र शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा या दोघांची खेळी निर्णायक ठरली. शिवम आणि जडेजा ही जोडी नाबाद परतली. शिवमने 34 तर जडेजाने 25 धावा केल्या. तर आरसीबी या पराभवसह 16 वर्षांची परंपरा कायम राखत पराभूत झाली.

आरसीबी 2008 नंतर चेपॉकमध्ये सीएसकेवर मात करण्यात अपयशी ठरली.चेन्नईकडून शिवम आणि जडेजा या दोघांव्यतिरिक्त डेब्यूटंट रचीन रवींद्र याने पहिल्याच डावात 37 धावांची खेळी केली. अजिंक्य रहाणेने 27 धावांचं योगदान दिलं. डॅरेल मिचेल याने 22 धावा जोडल्या. तर कॅप्टन ऋतुराज गायकवाड याने 15 रन्स केल्या. तर आरसीबीकडून कॅमरुन ग्रीन याने 2 विकेट्स घेतल्या. तर कर्ण शर्मा आणि यश दयाल या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.त्याआधी आरसीबीने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला.

आरसीबीला अनुज रावत याने केलेल्या सर्वाधिक 48 धावांच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 173 धावांपर्यंत मजल मारता आली. तसेच आरसीबीकडून दिनेश कार्तिक याने 38*, कॅप्टन फाफ डु प्लेसीस याने 35, विराट कोहली 21 आणि कॅमरुन ग्रीन याने 18 धावा केल्या. तर रजत पाटीदार आणि ग्लेन मॅक्सवेल या दोघांना भोपळाही फोडता आला नाही. सीएसकेकडून मुस्तफिजुर रहमान याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर दीपक चाहरने 1 विकेट घेतली.