भारताने आयोजित केलेला एकदिवसीय विश्वचषक २०२३ रोमांचक सामन्यांसह पुढे जात आहे. या स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शानदार सामन्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हा सामना १४ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. हा सामना डोळ्यासमोर ठेवून स्थानिक पोलिसांनी आधीच कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.
या सामन्यासाठी संपूर्ण अहमदाबाद शहरात सर्व सुरक्षा यंत्रणांचे ११ हजारांहून अधिक कर्मचारी तैनात असतील. त्यात दहशतवादविरोधी दल नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG), रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF), होमगार्ड आणि गुजरात पोलिसांचाही समावेश आहे.
नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये एक लाखाहून अधिक प्रेक्षक उपस्थित राहणार आहेत. या स्टेडियमची क्षमता सुमारे १.३० लाख प्रेक्षकांची आहे आणि सर्व तिकिटे विकली गेली आहेत. अशा स्थितीत हे स्टेडियम खचाखच भरले जाणार आहे. अहमदाबादचे पोलिस आयुक्त ज्ञानेंद्र सिंह मलिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, सामन्यादरम्यान ७ हजारांहून अधिक पोलिस आणि सुमारे ४ हजार होमगार्ड कर्मचारी तैनात असतील.
मलिक यांनी सांगितले की, एनएसजीची ३ टीम आणि अँटी ड्रोनची १ टीम देखील असेल. बॉम्बशोधक पथकासोबतच एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्याही तैनात करण्यात येणार आहेत. भारत-पाकिस्तान सामन्याच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांच्या उपस्थितीत उच्चस्तरीय बैठक घेतली होती. याशिवाय सुरक्षेसंदर्भातही बरीच तयारी करण्यात आली होती.
नरेंद्र मोदी स्टेडियम उडवून देण्याची धमकी
अलीकडेच अहमदाबाद पोलिसांना भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान नरेंद्र मोदी स्टेडियम उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे मिळाली होती. ५०० कोटी रुपयांव्यतिरिक्त, ज्या व्यक्तीने ईमेल पाठवला आहे त्याने तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या सुटकेचीही मागणी केली आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्यात आली आहे. एनएसजीसह इतर सुरक्षा यंत्रणांचीही मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
संवेदनशील भागातही पोलीस बंदोबस्त तैनात
पोलिस आयुक्त म्हणाले की, अहमदाबाद पोलिसांकडे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी प्लॅन-बी आहे. स्टेडियममध्ये वादग्रस्त बॅनर लावण्यास बंदी असेल. प्रेक्षकांचे प्रत्येक बॅनर आणि पोस्टर तपासले जातील. अहमदाबाद पोलिस सोशल मीडियावरही लक्ष ठेवून आहेत, जेणेकरून कोणीही अफवा पसरवू नये. शहापूर, दरियापूर, जमालपूर या शहरातील अनेक संवेदनशील भागातही पोलिस तैनात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय खेळाडूंच्याबाबतही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.