महानगरपालिकेच्या रस्त्यांवर हातगाड्यांवर कारवाई!

इचलकरंजी महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मुलन पथकाने शुक्रवारी अतिक्रमण निर्मुलन मोहिम राबविली. शहरातील विविध भागात ही कारवाई करण्यात आली. यामध्ये चार हातगाड्या जप्त करण्यात आल्या. दरम्यान, फूटपाथवर अनेक लहान मोठ्या व्यापाऱ्यांनी तसेच विक्रेत्यांनी स्टॉल लावून तसेच विविध साहित्य ठेऊन अतिक्रमणे केली आहेत. संबधितांवरही कारवाई करावी अशी मागणी होत आहे. शुक्रवारी रस्त्यावर कायमस्वरुपी ठेवलेल्या हातगाड्यांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी दिले होते.

त्यानुसार अतिक्रमण निर्मुलन विभागप्रमुख सुभाष आवळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाहू हायस्कूल, तीनबत्ती चौक, भारतमाता हौसिंग सोसायटी, संभाजी चौक आदी परिसरात अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आली. त्यामध्ये चार हातगाड्या, १६ स्टॅण्ड जप्त करण्यात आले. तसेच भारतमाता हौसिंग सोसायटी येथे लावलेल्या गाड्या काढून संबंधितांच्या ताब्यात देण्यात आल्या.

या मोहिमेत गणेश पुजारी, मारुती जावळे, धोंडीराम कावळे, प्रकाश हेगडे आदींनी सहभाग घेतला होता. शहरात दिवसेंदिवस अतिक्रमणे कमी होण्याऐवजी वाढताना दिसत असून फूटपाथही अतिक्रमणाच्या विळख्यात असल्याचे दिसत आहेत. त्यांकडूनही प्रमाणापेक्षा अधिक जागा व्यापली जात असल्याने वाहतूकीला अडथळा निर्माण होताना दिसत आहे. त्यामुळे याकडेही अतिक्रमण निर्मुलन पथकाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.