१ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) तिसरी ते सहावी इयत्तेसाठी नवीन अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके प्रकाशित करणार आहे.
इतर वर्गांच्या अभ्यासक्रमात आणि पाठ्यपुस्तकांमध्ये कोणताही बदल होणार नाही, असे सीबीएसईच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीईएसई) संलग्न शाळांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, एनसीईआरटीने त्यांना कळविले आहे की, इयत्ता तिसरी ते सहावीच्या नवीन अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तकांवर काम केले जात आहे. लवकरच ते प्रकाशित केले जातील.
सीबीएसईचे संचालक (शैक्षणिक) जोसेफ इमॅन्युएल म्हणाले की, तिसरी ते सहावीसाठी ही नवी पुस्तके असतील. एनसीईआरटीकडून साहित्य प्राप्त झाल्यानंतर ते सर्व शाळांना ऑनलाइन पाठविले जाईल.