मध्य प्रदेशातील प्रसिद्ध उज्जैन येथील महाकाल मंदिराच्या गर्भगृहात सोमवारी सकाळी भस्म आरतीच्या वेळी आग लागल्याची घटना घडली. यावेळी आग इतक्या वेगाने पसरली की, पुजारीसह १३ जण आगीत होरपळले. आरतीवेळी गुलाल टाकल्याने ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात आले. या घटनेने उपस्थित भाविकांमध्ये एकच गोंधळ उडाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
उज्जैनचे जिल्हाधिकारी नीरज कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. या आगीच्या घटनेत लोक किरकोळ भाजल्याचंही त्यांनी सांगितले. कोणीही गंभीर जखमी झालेलं नाही, असंही त्यांनी सांगितलं.जगप्रसिद्ध महाकालेश्वरच्या प्रांगणात रविवारी संध्याकाळी होळी उत्सवाला सुरुवात झाली. येथे सायंकाळच्या आरतीवेळी हजारो भाविकांनी महाकाल यांच्यासोबत गुलालाची होळी खेळली. त्यानंतर महाकाल प्रांगणात होलिका दहन करण्यात आले.
रविवारी सकाळी भस्म आरतीमध्ये भाविकांनी ५१ क्विंटल फुलांची होळी खेळून उत्सवाला सुरुवात केली. सायंकाळच्या आरतीच्या वेळी पुजाऱ्यांनी बाबा महाकालवर गुलालाची उधळण केली. यानंतर आरतीमध्ये सहभागी झालेल्या भाविकांनी मंदिरातच मोठ्या उत्साहात होळी खेळली.
महाकाल प्रांगणात पुजाऱ्यांनी मंत्रोच्चार करून होलिकेची पूजा केली. यावेळी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते, ज्यांनी होलिकेचं दर्शन घेतल्यानंतर होळी खेळण्यास सुरुवात केली. तर, दुपारी महाकाल मंडपात बाबा महाकाल यांनी आपल्या भूत-प्रेतांच्या सैन्यासह देवी पार्वतीसोबत मोठ्या उत्साहात होळी खेळली होती.