लोकसभा निवडणूक 2024 साठी ठाकरेंचं अखेर ठरलंय. शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवाऱ्यांची यादी तयार झाली आहे. महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या जागा वाटपाचा तिढा कायम असताना मात्र उद्धव ठाकरेंची रणनिती ठरली आहे. शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाऱ्यांची यादी जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना म्हणजे ठाकरे गट 20 जागा, राष्ट्रवादी शरद पवार गट 10 आणि काँग्रेस 16 अशा जागा लढविणार आहेत.
अशातच उद्धव ठाकरेंची पहिली यादी तयार झाली असून ती उद्या सामनातून जाहीर करण्यात येणार आहे. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलंय की, शिवसेना गटाची पहिली यादी जी 15 ते 16 जागांसाठी आहे त्यासाठी उमेदवार निश्चित झाली आहेत.आज मातोश्रीवर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची लोकसभा निवडणूक 2024 साठी जागेवाटपावर चर्चा करण्यासाठी बैठक होणार आहे.
संध्याकाळी पाच वाजता ही बैठक होणार आहे. शिवसेना आपल्या पहिल्या यादीत रायगड, रत्नागिरी, ठाणे, परभणी, बुलढाणा, यवतमाळ या वाद नसलेल्या मतदारसंघांतील उमेदवार घोषणा करु शकते. त्याशिवाय कायम गाजणारे छत्रपती संभाजीनगर, शिर्डी, दक्षिण, मुंबई, सांगली आणि मावळ या जागांचाही यात समावेश असू शकतो. या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी कोणाला संधी दिली आहे उद्याच्या सामनामधून कळणार आहे.