मार्च महिना म्हटल की सगळीकडे वसुली हि चालू असते. घरफाळा वसुलीसंदर्भात महापालिकेने कडक धोरण स्वीकारले आहे. एक लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या मिळकतधारक थकबाकीदारांची नावे वृत्तपत्रांतून प्रसिद्ध करण्याचे आदेश आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी कर विभागास दिले आहेत.
मार्च महिना आल्याने व्यापक करवसुली धोरण राबविण्यात येत आहे. त्यासाठी पाच वसुली पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पथकाकडून वॉर्डनिहाय थकबाकीदारांच्या घरी जाऊन वसुलीसाठी प्रयत्न केले जात आहेत. परंतु त्यांना प्रतिसाद मिळेना झाला आहे. घरफाळा व पाणीपट्टी थकबाकी भरण्यास सहकार्य करत नसल्याची बाब बैठकीत आयुक्त दिवटे यांच्या निदर्शनास आली.
त्याची दखल घेत त्यांनी पहिल्या टप्प्यात शहरातील एक लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या थकबाकीदारांची नावे वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्याचे आदेश कर विभागास दिले आहेत. घरफाळा न भरल्यास दुसऱ्या टप्प्यात थकबाकीदारांची पाणी जोडणी तोडणे आणि मिळकत सील करण्याची कारवाई करण्याचे आदेशही दिले. यावेळी उपायुक्त सोमनाथ आढाव आणि कर विभागातील अधिकारी उपस्थित होते.