लोकसभेच्या प्रचार सभांसाठी अर्ध्या एकरापासून आठ एकराचा परिसर!

लोकसभा निवडणुकीसाठी वरिष्ठ नेत्यांच्या जाहीर सभा होतील. त्याअनुषंगाने मैदान व जाहीर सभांसाठी शहरातील दहा मैदाने निश्चित करण्यात आली आहेत. तर कॉर्नर सभांसाठी १४ चौक राखीव ठेवले जाणार आहेत.जाहीर सभांसाठी शहरात केवळ लक्ष्मी पेठेतील जुनी मिल कंपाउंड मैदान आणि पुंजाल मैदान हे दोनच मैदाने आहेत. तर आठ मैदानांची यादी महापालिकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविली आहे.

२०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा पार्क स्टेडिअममध्ये झाली होती. पण, आता ते मैदान चकाचक केल्याने त्याठिकाणी कोणाचीही सभा होणार नाही. होम मैदानावर देखील सभा घेता येणार नाही, कारण या मैदानाचे नाव महापालिकेच्या यादीत नाही. केंद्रातील किंवा पक्षाचा वरिष्ठ नेता जाहीर सभेसाठी आल्यावर जागा मोठी लागते. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींची माढा व सोलापूर या दोन्ही मतदारसंघासाठी एक सभा होवू शकते, असे भाजपमधील एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

पण, शहरातील मैदानांची स्थिती पाहता त्यांची सभा कोठे घ्यायची हा पेच आहे. १२ एप्रिलनंतर प्रचार रंगणार असल्याने भाजपचे अनेक वरिष्ठ नेते सोलापूर व माढ्याच्या उमेदवाराचा प्रचार करण्याच्या निमित्ताने वारंवार सोलापूरमध्ये येतील, असेही सांगितले जात आहे.