कॉग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विजयाचे गणित मांडून ठेवले आहे. मोहोळ, पंढरपूर, शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील मतांच्या जोरावर आमदार प्रणिती शिंदे यांचा विजय होईल, असा आडाखा काँग्रेस नेत्यांनी मांडला आहे.शहर उत्तर, अक्कलकोट आणि सोलापूर दक्षिण मतदारसंघातील मतांच्या जोरावर आमदार राम सातपुते विजयी होतील, असा भाजप नेत्यांचा दावा आहे.
सोलापूर लोकसभेसाठी एकूण ५९.१९ टक्के मतदान झाले. ४ जूनला निकाल आहे. या मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत.सर्वाधिक मतदान मोहोळ विधानसभा मतदारसंघात ६३.१५ टक्के झाले. भाजप, काँग्रेस या दोन्ही पक्षांचे निवडणूक प्रमुख, शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष, जिल्हा उपाध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांकडून निकालाचा कल जाणून घेतला
पंढरपूर, मोहोळ मतदारसंघात भाजप मागे राहील, असा भाजप नेत्यांचाही अंदाज आहे. परंतु, शहर उत्तरमधून सातपुतेंना ४५ हजार, अक्कलकोटमधून २० हजार, शहर मध्यमधून १० हजाराचे मताधिक्य मिळेल,
या मतांच्या जोरावरच सातपुते किमान ५० हजाराने निवडून येतील, असे नेते सांगतात. सोलापूर दक्षिणचा शहरी भाग भाजपच्या बाजूनेच राहील. शहर मध्यबाबत काँग्रेसने केलेला ३० हजार मताधिक्याचा दावा फोल राहील यावर सर्व भाजप नेत्यांचे एकमत आहे.काँग्रेस नेत्यांच्या मते, आमदार प्रणिती शिंदे यांना मोहोळ मतदारसंघातून ३० हजार, पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून सुमारे २५ हजार, शहर मध्यमधून ३० हजार आणि सोलापूर दक्षिण मतदारसंघातून १५ हजाराचे मताधिक्य मिळेल, शहर उत्तर, अक्कलकोट मतदारसंघात काँग्रेस मागे राहील असा नेत्यांचा अंदाज आहे.