शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीसह रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी परिवहन विभागाने स्कूल व्हॅन परवाने वाटप खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची अधिसूचना लवकरच जारी होईल, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
परिवहन विभागाने बोलावलेल्या पालक आणि बस संघटना प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत अनधिकृत वाहनांतून विद्यार्थी वाहतूक होत असल्याचा मुद्दा गाजला होता. देशात सुरक्षित विद्यार्थी वाहतूकीसाठी केंद्र सरकारने स्कूल बस नियमावलीचा (ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड्स अर्थात एआयएस-०६३) आधार घेऊन अद्यावत मानके अर्थात स्कूल व्हॅन नियमावली (एआयएस-२०४ ) तयार केली आहे. चारचाकी १२+१ आसनापर्यंत विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनाला शालेय व्हॅनचा दर्जा देण्यात येणार आहे. ही वाहने BS-VI या श्रेणीतील असणार आहेत. यात चालक ओळखपत्र, आपत्कालीन निर्गमन, वाहन प्रवेश, स्टोरेज रॅक यांच्या स्पष्टतेसह आसन रचना, अग्निशमन अलार्म यंत्रणा, वाहन ट्रॅकिंग अशा आधुनिक सुरक्षा तंत्रज्ञानाचा ही समावेश केला आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
राज्य सरकारकडून परिवहन विभागामार्फत सन २०१८ पर्यंत स्कूल व्हॅनसाठी परवाने देण्यात येत होते. मात्र स्कूल व्हॅन विद्यार्थी वाहतूकीसाठी असुरक्षित असल्याचे सांगत काहींनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. केंद्राच्या मानकानुसार राज्य सरकारने नियमावली तयार करून व्हॅन सुरू करण्याबाबतची सूचनावली प्रसिद्ध केली आहे. त्याआधारे राज्य सरकारने हे धोरणात्मक पाऊल टाकले असुन या संदर्भात अधिसूचना जारी होईल, असेही मंत्री सरनाईक यांनी सांगितले .
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीला प्रथम प्राधान्य देतानाच सुरक्षित वाहतूकीसोबत बेरोजगारांना रोजगाराची संधी देण्यासाठी स्कूल व्हॅन धोरणाला मंजुरी देण्यात येत आहे. नव्या धोरणानुसार स्कूल व्हॅनमधून विद्यार्थी वाहतूकीचा व्यवसाय सुरू करणाऱ्यांना राज्य सरकारकडून परवाने देण्यात येतील. राज्यात अत्याधुनिक सुरक्षा सुविधांनी युक्त स्कूल व्हॅन चालू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे,असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.
