हातकणंगलेच्या उमेदवारीसाठी इच्छुकांची मातोश्रीवर धाव!

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खासदार धैर्यशील माने यांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे. इकडे महाविकास आघाडीचा उमेदवार कोण याचा गुंता सुटताना दिसत नाही.उद्धव ठाकरे यांच्या निर्णयावर निकालाचा रागरंगही ठरणार आहे. तोवर शिवसेनेची उमेदवारी मिळावी यासाठी पक्षाचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, माजी सत्यजित पाटील यांच्यासह आमदार प्रकाश आवाडे यांचे सुपुत्र राहुल आवाडे, मराठा क्रांती सेनेचे संस्थापक सुरेशदादा पाटील यांनी ‘मातोश्री’ची पायधूळ झाडायला सुरुवात केली आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात खासदार धैर्यशील माने विरुद्ध माजी खासदार राजू शेट्टी यांच्यात मुख्य लढत असणार आहे. तथापि मविआचा पाठिंबा कोणाला याची उकल अद्याप झालेली नाही. त्यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. मविआने हा मतदारसंघ शिवसेनेला सोडला आहे. मविआने शेट्टी यांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली असली तरी त्यांना काँग्रेस व राष्ट्रवादीचा पाठिंबा नको आहे. कारण या पक्षाचे साखर सम्राट प्रचाराच्या मंचावर आली की त्याचा फटका बसतो याचा शेट्टी यांना गत निवडणुकीत कटू अनुभव आला आहे.

त्यामुळे शेट्टी यांना केवळ शिवसेनेचा पाठिंबा हवा आहे.उद्धव ठाकरे व राजू शेट्टी यांच्या दोन वेळा चर्चा झाल्या असल्या तरी अद्यापही निर्णय झालेला नाही. शेट्टी यांच्याशी जुळणार नसेल तर ठाकरे यांनी मशाल चिन्हावर उमेदवार उभा करण्याचे ठरवले आहे. या अंतर्गत हातकणंगलेचे माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, शाहुवाडी पन्हाळ्याचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांच्यापैकी एकाची निवड करण्याचे घाटत आहे. शिवसेनेच्या मतांचा मोठा गट्टा या मतदारसंघात असून तो निर्णायक ठरणारा आहे.