इचलकरंजी शिवाजीनगर पोलिसांनी तिघा सराईत चोरट्यांना गजाआड करून घरफोडी आणि वाहन चोरी अशा दोन वेगवेगळ्या घटनांचा छडा लावला. कबनूर परिसरात राहणाऱ्या सुदन वसंत रेवणकर (रा. धुळेश्वरनगर) यांच्या मालकीचे वसंत ज्वेलर्स नावाने सराफी दुकान आहे. १२ जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्याने दुकान फोडून त्यातील ४८६० रुपयांचे चांदीचे दागिने लंपास केले होते. ही चोरी अर्जुन वडर याने केली असल्याची माहिती पोलिस उपनिरिक्षक नाथा गळवे यांना मिळाली. त्यानुसार वडर याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने या चोरीची कबुली दिली.
तर चौकशीत त्याने कबनूर परिसरातीलच इंदिरा हौसिंग सोसायटीमधील एका घरात चोरी केल्याची कबुली दिली. या दोन्ही चोरी प्रकरणी वडर याला अटक करून दोन्ही गुन्ह्यांतील मिळून २३ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
त्याचबरोबर रुई (ता. हातकणंगले) येथील अक्षय पुंडलिक लोहार (वय २७) यांची दुचाकी कबनूर – चंदूर मार्गावरील आभारफाटा येथील एटीएम पासून २ जून रोजी चोरीस गेली. या चोरीचा तपास करत असताना शिवाजीनगर पोलिसांना धर्मराज चौकात सागर चव्हाण आणि सौरभ बंडगर हे दोघे संशयितरित्या दुचाकीवरून फिरताना मिळून आले. त्यांच्याकडे दुचाकीबाबत विचारणा केली असता दोघांनी मिळून चोरीची कबुली दिली. त्यामुळे दुचाकी जप्त करून दोघांना अटक केली. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता या दोघांनी कर्नाटकातील कुडची, उगार आणि ऐनापूरमधून तीन दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून एकुण १ लाख ९५ हजाराच्या चार दुचाकी जप्त केल्या आहेत.
पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईत उपनिरीक्षक नाथा गळवे, सहाय्यक फौजदार रावसाहेब कसेकर, वसंत घुगे, सुनिल बाईत, विजय माळवदे, सतीश कुंभार, सुकुमार बरगाले, पवन गुरव, अरविंद माने, संग्राम खराडे सहभागी झाले होते.
सराफी दुकानात चोरी प्रकरणी अर्जुन आण्णाप्पा वडर (वय २६ मुळ रा. साठेनगर, कबनूर) तर वाहन चोरी प्रकरणी सागर महादेव चव्हाण (वय ३० रा. कुडची) आणि सौरभ संजय बंडगर (वय २४ रा. बोलवाड, ता. मिरज) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून २३ हजार ३८० रुपयांचा ऐवज आणि १ लाख ९५ हजार रुपयांच्या चार दुचाकी असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती पोलिस निरिक्षक राजू ताशिलदार यांनी दिली.