महालिंगपूर (जि. बागलकोट) येथे गर्भपातावेळी सोनाली सचिन कदम (वय ३२, रा. आळते, ता. हातकणंगले) हिचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणात कविता बडनेवार या बोगस डॉक्टर महिलेस अटक केली आहे.तर मृत सोनालीचा भाऊ देखील पोलिसांच्या ताब्यात आहे. महालिंगपूर पोलिसांनी केलेल्या तपासात रामानंदनगर (कर्नाटक) येथीलही आणखी एका डॉक्टरचे नाव निष्पन्न झाले आहे. लवकरच त्यालाही ताब्यात घेतले जाणार आहे. दुधगाव येथे माहेर असलेल्या सोनाली कदम हिचा आळते येथील सचिन कदम याच्याशी विवाह झाला आहे. त्यांना दोन मुली आहेत.
सचिन हा सैन्यदलात कार्यरत असून सध्या राजस्थानात कार्यरत आहे. सोनाली ही तिसऱ्यांदा गर्भवती असताना जयसिंगपूर येथे गर्भलिंग निदान चाचणी करण्यात आली. त्यानंतर कर्नाटकात गर्भपात करताना महालिंगपूर येथे सोमवारी मृत्यू झाला होता. तेथील डॉक्टरांनी या प्रकरणात मृत्यूचा दाखला देण्यास नकार दिल्याने सोनाली यांचे नातेवाइक मृतदेह घेऊन सांगलीत आले होते. मृत्यूच्या दाखल्यासाठी सांगलीत डॉक्टर शोधत फिरत असताना सांगली शहर पोलिसांच्या सतर्कतेने हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला.
सांगली शहर पोलिसांनी मृत सोनालीचा भाऊ आणि मदत करणाऱ्या बोगस डॉक्टरला महालिंगपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सांगली शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने बागलकोट येथे जावून तेथील अधिकाऱ्यांची भेट घेऊन गुन्हा वर्ग केला आहे. महालिंगपूर पोलिसांनी प्राथमिक तपासात कविता बडनेवार या बोगस डॉक्टर महिलेला अटक केली आहे.
तिच्याकडे कोणताही वैद्यकीय परवाना नसताना तिने सोनाली यांचा गर्भपात केला होता. यावेळी प्रकृती गंभीर बनल्याने तिचा मृत्यू झाला होता. महालिंगपूर पोलिस कविता हिची चौकशी करत आहेत. या प्रकरणात रामानंदनगर (कर्नाटक) येथीलही एका डॉक्टरचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे.