बाजारातील आंब्याच्या अस्सलतेची शंका नेहमीच ग्राहकांकडून उपस्थित होत असते. सांशकतेच्या धुक्यातून ग्राहकांना बाजूला करीत आता पोस्ट विभागाने उत्पादक ते ग्राहक अशी सेवा सुरू केली आहे.देवगडचा अस्सल अन् तोही सेंद्रिय पद्धतीने पिकविलेला हापूस आंबा पोस्टातून मिळणार आहे.
भारतीय टपाल विभागामार्फत अनेक ग्राहक उपयोगी योजना सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून थेट उत्पादकांना ग्राहकाशी जोडण्यासाठी पोस्टाने पाऊल उचलले आहे. शेतकऱ्याचा माल ग्राहकापर्यंत पोहचवून त्याच्या मालास योग्य ते मूल्य व बाजारपेठ मिळवून देण्यात येत आहे.
देवगड हापूस आंबा आता सांगली शहरातील निवडक टपाल कार्यालयात उपलब्ध करून देण्यात येत आहे.कोकणातील दहिबाव (ता. देवगड) येथील फळ उत्पादक श्रीधर ओगले यांच्याशी पोस्टाने नुकताच करार केलेला आहे. ओगले हे आंबा व्यवसायात १८ वर्षे कार्यरत आहेत.
तसेच ते सिंधुदुर्ग जिल्हा फळ प्रक्रिया उत्पादक संघाचे अध्यक्ष आहेत.ओगले यांच्या बागेतील आंब्यास जीआय मानांकन प्राप्त झाले आहे. कोणत्याही रासायनिक पद्धतीच्या वापर शिवाय नैसर्गिक पद्धतीने पिकविलेला आंबा ते उपलब्ध करून देणार आहेत.
त्यामुळे ग्राहकांना खात्रीशीर उत्पादन मिळण्यास मदत होणार आहे.ग्राहकांना आगाऊ नोंदणी करुन आंबा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दिला जाणार आहे. पेटी घरपोहोच हवी असल्यास अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. नोंदणी केल्यानंतर ग्राहकांना त्यांच्या आंबा पेटीच्या डिलिव्हरीची तारीख कळविण्यात येणार आहे.
रत्नागिरी पोस्ट कार्यालयामार्फत येत्या काही दिवसांत आंब्याच्या बुकिंगची योजना सुरू होणार आहे. याच कार्यालयामार्फत मुंबई व पुण्यातील लोकांना आंब्यासाठी बुकिंग करता येईल. रत्नागिरी कार्यालयामार्फत नोंदणी करावयाची पोस्ट कार्यालयेसुद्धा जाहीर होतील.
सांगलीतील चार पोस्ट कार्यालयात नोंदणीसाठी ऑफलाईनचीच व्यवस्था आहे. ऑनलाईन नोंदणी सध्या तरी करता येत नाही.
याठिकाणी करा नोंदणी
सांगली हेड पोस्ट ऑफिस
मिरज हेड पोस्ट ऑफिस
सांगली सिटी पोस्ट ऑफिस
विलिंग्डन कॉलेज पोस्ट ऑफिस