राहुल पाथरवट याने रोहित तडाखे याच्या नावे कर्ज प्रकरण करून दुचाकी घेतली होती. परंतु, त्या दुचाकीचे हप्ते राहुल याने न भरल्याने वसुलीसाठी बँकेचे लोक रोहित याच्या घरी येत होते. यासंदर्भात रोहित याने राहुल याच्याकडे विचारणा केली. त्यावरून रोहित व राहुल यांच्यात भांडण झाले होते. शुक्रवारी रात्री साईट नं. १०२ परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान येथे राहुल विनोद पाथरवट, संदेश विनोद पाथरवट आणि नाथा पुंडलिक जावीर या तिघांनी मिळून धारदार चाकूने वार करून गळा चिरून रोहित तडाखे याचा खून केला होता.
याप्रकरणी राहुल व संदेश या दोघा भावांना पोलिसांनी अटक केली होती. घटनेनंतर शंकर जावीर हा मिळाला नव्हता. रोहित बाळू तडाखे याच्या खून प्रकरणातील संशयित आरोपी नाथा उर्फ शंकर पुंडलिक जावीर (रा. साईट नं. १०२) याला गावभाग पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता उद्या, मंगळवारपर्यंत पोलिसकोठडी सुनावण्यात आली.