चोरीच्या प्रमाणात वाढ! सीसीटीव्ही बसविण्याची मागणी……

अलीकडच्या काळात गुन्हेगारी प्रमाणात खूपच वाढ झालेली पहायला मिळत आहे. म्हणजेच चोरी, मारामारी या प्रकरणात दिवसेंदिवस वाढच होत चालली आहेत. चंदूर गावभाग परिसर व आभार फाटा परिसरात भुरट्या चोरीचे प्रमाण वाढल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. रात्री घरासमोरील पार्किंग केलेल्या दुचाकी, गाडीतील पेट्रोल, सायलेन्सर, पेट्रोलची टाकी इत्यादी साहित्य तसेच ट्रक, डंपर, टेम्पोमधील बॅटऱ्या, डिझेल चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे चंदर परिसरातील नागरिक हवालदिल झाले आहेत.

गाडीचे सायलेन्सर व पेट्रोल, टाकी इत्यादीवर डल्ला मारण्याचे काळेधंदे सुरू केले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. किरकोळ चोरीसाठी नागरिक पोलिसात तक्रार दाखल करीत नाहीत याच गोष्टी चोरट्यांना फावत असून त्यांचे दिवसेंदिवस चोरीचे प्रमाण वाढत चालले आहे. यावर पोलीस रात्रीची गस्त वाढवावी व भुरट्या चोरांचा कायमचा बंदोबस्त करावा. तसेच सार्वजनिक ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासनाने सीसीटीव्हीची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.