पुन्हा राजू शेट्टी- धैर्यशील माने आमने-सामने!

लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदार संघाकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलेले आहे. या मतदार संघात चुरशीची लढत होणार आहे. गतवेळच्या लोकसभा निवडणुकीमध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून विजयाची हॅटट्रिक करण्यात अपयशी ठरलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी व शिवसेनेचे विद्यमान खासदार धैर्यशील माने पुन्हा मैदान मारण्यासाठी सज्ज झाले आहेत.

गेल्या काही दिवसांमधील घडामोडी पाहता मिरज पश्चिम भागातील मतदान राजकीयदृष्ट्या निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे व राष्ट्रवादीच्या नेत्या निवेदिता माने यांचा पराभव करुन ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नेते राज शेट्टी यांनी दोन वेळा विजयश्री खेचून आणून या मतदारसंघाचे नेतृत्व केले. गतवेळच्या निवडणुकीत माजी खासदार निवेदिता माने यांचे चिरंजीव धैर्यशील माने यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

मतदारसंघात दोन ते तीन कार्यक्रम आयोजित करून ताकद दाखवली. याचे फलित म्हणून त्यांना हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या शिवसेनेतर्फे उमेदवारी दिली. त्यांनी या निवडणुकीत राजू शेट्टींवर निसटता विजय मिळवला.
आखाड्यात शिवसेनेतील फाटाफूट, धैर्यशील माने यांनी शिंदे गटात केलेला प्रवेश आणि शिंदे यांनी त्यांना पुन्हा एकदा संधी दिल्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा माने विरुद्ध शेट्टी लढत अटीतटीची ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत. यावेळी शेट्टी माने यांच्या लढतीत कोण बाजी मारणार? याची उत्सुकता सर्वानाचं लागून राहिलेली आहे.