एएससी कॉलेज चौकात बसथांब्यावर वाहतूक कोंडी!

इचलकरंजीत कायम आपणाला गर्दी पहायला मिळते. त्यामुळे प्रवाशाचे खूपच हाल होत असतानाचे चित्र आपणाला पहायला मिळतेच. इचलकरंजी-कोल्हापूर मार्गावरील प्रमुख चौक असणारा एएससी कॉलेज चौकातील वाहतुकीची कोंडी फुटता फुटेना झाली आहे. कोंडी फोडण्यासाठी कॉलेजने प्रशासनाला बस थांबा हलविण्यासाठी पत्र दिल्यानंतर वाहतूक शाखेने सर्व्हे केला. मात्र, याची कार्यवाही प्रत्यक्षात चौकात तर दूरच कागदावरही झाली नाही. शहर जागे झाल्यापासून झोपेपर्यंत एएससी कॉलेज चौकात कायम वर्दळ असते. वाहने, एसटी बसेस मोठ्या प्रमाणात चौकातून मार्गस्थ होतात.

तसेच या चौकात बस थांबाही आहे. कोल्हापूर मार्गावर निघणारी प्रत्येक एसटीचा याठिकाणी थांबा आहे. साधारण प्रत्येक मिनिटाला एसटी येथे थांबल्यानंतर मागे वाहनांची रांगच लागते. त्यातच प्रवासी, विद्यार्थ्यांची एसटीमध्ये चढण्यासाठी गर्दी होत असते. अशा परिस्थितीत मिनिटा मिनिटाला होणाऱ्या वाहतूक कोंडीतून मुक्त होण्याची प्रतीक्षा विद्यार्थी, पादचारी, वाहनधारकांना करावी लागली आहे. अशात चौकातील हातगाड्यांचे अतिक्रमणही कळीचा मुद्दा ठरतो. अनेकदा महापालिकेकडून चौकात अतिक्रमण मोहीम राबविली. मात्र, कारवाई झालेल्या दुसऱ्या दिवसांपासून पुन्हा अतिक्रमण थाटले जाते. सध्या वाहतूक कोंडी वाढत असताना त्यात अतिक्रमणाची भर वाढली असून, चौकाचा श्वास कोंडला आहे.