कार्यकर्त्यांनी विठ्ठल चोपडेंना दिला धीर! आता रडायचं नाही लढायचं….

विधानसभेची निवडणूक लढवणे सोपं नाही. पोत्यानं पैसा ओतून दबदबा निर्माण करावा लागतो; पण कोणतीही भक्कम आर्थिक स्थिती नसताना विठ्ठल चोपडे दोन धनदांडग्या उमेदवारांशी दोन हात करत आहेत. अर्थात निस्वार्थ भावनेने रात्रीचा दिवस करणारे कार्यकर्ते हीच त्यांची जमेची बाजू असून कार्यकर्त्यांच्या, सर्वसामान्य जनतेच्या पाठबळावर विठ्ठल चोपडे यांनी प्रस्थापितांच्या नाकी नऊ आणले आहे.

 इचलकरंजी विधानसभा निवडणुकीत धनदांडगे प्रस्थापितांशी दोन हात करण्यासाठी विठ्ठल चोपडे रणांगणात उतरले आहेत. निस्वार्थ भावनेने कार्यकर्ते त्यांच्या पाठीशी हिमालयाप्रमाणे उभे आहेत. निवडणुकीची तयारी व आढावा घेण्यासाठी शहर कार्यालयात कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्यात बोलताना विठ्ठल चोपडे भाऊक झाले. मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना विठ्ठल चोपडे भाऊक झाले आणि त्यांनी ढसाढसा रडत अश्रूंना वाट मोकळी करून दिली.  यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांना आता रडायचे नाही, लढायचं, अशा घोषणा देत धीर दिला.

चोपडे म्हणाले, आपल्याकडे पक्ष नाही. कोणताही मोठा नेता नाही. निवडणूक लढवण्यासाठी लागणारी यंत्रणा तोकडी आहे. पण भागात दोन चार कार्यकर्ते असले तरी त्यांच्याकडे हत्तीचे बळ आहे. या बळावर आपणास निश्चित यश मिळेल, असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला.