ज्यादा परताव्याच्या आमिषाने ४९ लाखांचा डल्ला! ऑनलाईन गुंतवणुकीतून फसवणूक…

शेअर ट्रेडिंग ॲपच्या माध्यमातून मोठा नफा मिळवण्याचे आमिष दाखवून कबनूर (ता. हातकणंगले) येथील बड्या सहकारी संस्थेच्या अध्यक्षाची तब्बल ४९ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार गुरुवारी समोर आला आहे. या प्रकरणात गावातील एकूण १३ गुंतवणूकदारांचा समावेश असून संशयितांनी समाज माध्यमाच्या आधारे कॉल करून त्यांच्या संपर्कात येत विश्वास संपादन केला आणि हा डल्ला मारला आहे.

याबाबतची फिर्याद मिलिंद जयकुमार कोले (वय ६१, रा. तिरंगा कॉलनीसमोर, कबनूर) यांनी पोलिस ठाण्यात दिली आहे.याप्रकरणी मीरा राणा, राजीव सप्तर्षी, डीना, प्रिया, राहुल महांती या पाच व्हॉटस्‌ ॲप अकौंटधारकांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हॉटस्‌ ॲप क्रमांकावरून संशयितांचे लोकेशन गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशमध्ये असल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याने आभासी पद्धतीने झालेल्या या फसवणूक प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः मिलिंद कोले यांच्याशी २६ ऑगस्टला व्हॉटस्‌ ॲप कॉलिंगच्या माध्यमातून संशयित मीरा राणा यांनी संपर्क साधला. शेअर मार्केटमध्ये एका ट्रेडिंग कंपनीकडून बोलत असल्याचे भासवून मोठ्या प्रमाणात नफा मिळवण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर ट्रेडिंग कंपनीच्या व्हॉटस्‌ ॲप ग्रुपमध्ये समाविष्ट करून घेतले.

ग्रुपवर अधिक परतावा मिळाल्याचे स्क्रीनशॉट पाठवून कोले यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर कोले यांनी स्वतःसह अन्य १२ सहकाऱ्यांचे पैसे त्या कंपनीच्या शेअर ट्रेडिंग ॲपवर गुंतवण्यास सुरुवात केली. मागील दीड महिन्याच्या काळात अन्य संशयितांनी व्हॉटस्‌ ॲप नंबरवरून कॉलिंग करून व्यवहारांद्वारे गुंतवणूकदारांना आकर्षित केले आणि नफा मिळाल्याचे भासवले. त्यानंतर गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढत गेल्याने गुंतवणुकीची रक्कमही मोठ्या प्रमाणात वाढतच गेली.

अखेरपर्यंत गुंतवणुकीची रक्कम वाढवण्याचे सांगून ४९ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. गुंतवणुकीच्या बदल्यात मोठ्या प्रमाणात नफा मिळण्याची अपेक्षा असताना दोन दिवसांपूर्वी संपर्क तुटला. यानंतर कोले यांनी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सर्व फोन बंद असल्याचे लक्षात आले आणि शेअर ट्रेडिंग ॲपही बंद झाले.

संशयितांनी स्वतःच्या फायद्यासाठी शेअर मार्केटमध्ये पैसे न गुंतवता ते विविध बँक लाभार्थी खात्यांवर वळते करून घेतले. याबाबत कोले यांच्या फिर्यादीनुसार शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी संबंधित गुंतवणूकदारांची माहिती गोळा केली आहे. संशयितांनी वापरलेल्या क्रमांकाचा शोध घेऊन सायबर क्राईम शाखेद्वारेही तपास सुरू केला आहे.